
अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या पालीमधील रहिवाशांना सध्या ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा भोगावी लागत आहे. नळामधून अत्यंत दूषित असे काळ्या रंगाचे पाणी येत असल्याने 15 हजार पालीवासीयांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 27 कोटी रुपयांची शुद्ध पाणीपुरवठा योजना सध्या लालफितीत अडकल्याने नागरिकांच्या नशिबी काळे पाणी आले असून गणराया.. प्रशासनाला लवकर सुबुद्धी दे, असे साकडेच विघ्नहर्त्याला घातले आहे.
खडक आळी येथील नळांना मागील महिनाभरापासून काळे कुट्ट पाणी येत आहे. सुरुवातीचे काही काळ काळे पाणी येते आणि त्यानंतर मग थोडे स्वच्छ पाणी येते. याचबरोबर काही दिवसांपूर्वी बल्लाळेश्वरनगर, प्रबुद्धनगर आदी ठिकाणीदेखील गढूळ, काळे व हिरवे पाणी येत होते.
पालीच्या विविध भागांतील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेक वेळा बाहेर आले आहेत. मात्र आता चक्क काळ्या रंगाचे पाणी नळातून येत आहे.
पाली नगर परिषदेने 27 कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना काही वर्षांपूर्वी आखली होती. मात्र विविध कारणांमुळे ही योजना लालफितीत अडकली आहे.
नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शुद्ध पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रश्न मिटेल, अशी आशा नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांनी व्यक्त केली.
पोटाचे विकार जडले
नगरपंचायतीतर्फे उन्हेरे धरणातील पाणी अंबा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे अंबा नदीचे पाणी काही प्रमाणात शुद्ध झाले आहे. शेवाळ व घाण कमी झाली आहे. मात्र तरीही सुरुवातीला नळांना होणारा पाणीपुरवठा हा गढूळ पाण्याचा होतो. कारण नळांमध्ये घाण, शेवाळे जाऊन साठते आणि ती घाण नळाद्वारे बाहेर येते. त्यामुळे हेच दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. अनेकांना पोटाचे विकारही जडले आहेत.