
अवघ्या 28 चेंडूंत 5 षटकारांची बरसात करत अयुब शेखने फटकावलेल्या 60 धावांच्या अभेद्य आणि स्फोटक खेळीने पंधारी किंग्ज संघाच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवल्या. दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबने पंधारी किंग्जचा 26 धावांनी धुव्वा उडवत सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज धडक मारली. आता उपांत्य फेरीत डिंग डाँग–बालाजी क्लब आणि दुर्गापूर फ्रेंड्स–एफएम हॉस्पेट अशा लढती रंगतील.
आज एअर इंडियाच्या मैदानावर अयुब शेखचे वादळ घोंगावले आणि या वादळात पंधारी किंग्ज संघ अक्षरशः पालापाचोळय़ासारखा उडून गेला. अयुबची फटकेबाजी इतकी भन्नाट होती की, पंधारी किंग्जच्या गोलंदाजांसमोर अंधारी आली होती आणि त्यांना काहीही सुचेनासे झाले होते. पंधारी किंग्जने नाणेफेक जिंकून दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबला फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्याचा पुरेपूर फायदा अयुब शेखने उठवला. त्याच्या घणाघाती फलंदाजीच्या जोरावर दुर्गापूरने 8 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात 87 धावा चोपल्या. प्रत्युत्तरादाखल पंधारी किंग्जचा संघ 8 षटकांत 61 धावांपर्यंतच मजल मारू शकला. दुर्गापूरच्या सर्वोनिल रायने 11 धावांत 3 विकेट टिपत पंधारीचा पराभव निश्चित केला.
टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱया या स्पर्धेत श्रीलंकन क्रिकेटरसह कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजकोट केरळसहित देशातील अव्वल टेनिस क्रिकेटपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघावर 12 लाखांच्या रोख पुरस्कारासह संघातील प्रत्येक खेळाडूला बाईक देऊन गौरविले जाणार आहे. जो सुप्रिमो चषकाची ट्रॉफी उंचावेल त्या संघातील प्रत्येक खेळाडू हा लखपती होणार असल्याची माहिती आयोजक आमदार संजय पोतनीस यांनी दिली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
थरारक सामन्यात पंधारी किंग्ज विजयी
दुसऱया सामन्यात मुंबईच्या पंधारी किंग्ज संघाने सचिन ढवळे प्रहार इलेव्हन संघाचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. पंधारी संघाने सातव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या बबलू पाटीलच्या 13 चेंडूंतील 30 धावांच्या जोरावर 6 बाद 80 धावा केल्या होत्या तर 81 धावांचा पाठलाग करताना सचिन ढवळे प्रहार इलेव्हनच्या दत्ता पवार आणि महेश नानगुडेने 53 धावांची सलामी देत संघाच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. त्यांना शेवटच्या 6 चेंडूंत 18 धावांची गरज होती, पण प्रहार इलेव्हनला 11 धावाच काढता आल्या. शेवटच्या 3 चेंडूंवर 11 धावांची गरज असताना स्ट्राईक नानगुडेकडे होती आणि त्याने 2, 2 अशा चार धावा काढल्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती तेव्हा षटकार खेचून सामना बरोबरीत सोडवण्याच्या प्रयत्नात नानगुडे झेलबाद झाला आणि ढवळे प्रहार इलेव्हनने सामना 6 धावांनी गमावला. महेश नानगुडेने 21 चेंडूंत 30 धावा ठोकल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. विजयी संघाचा बबलू पाटील सामनावीर ठरला.
दुर्गापूरचा सहज विजय
उपउपांत्यपूर्व फेरीत दुर्गापूर फ्रेंड्स युनियन क्लबने राजकोटच्या रार हॅरी संघाचा 5 विकेट राखून पराभव केला. जेनिश ठाकूरच्या 29 धावांच्या खेळीच्या जोरावर रार हॅरी संघाने 8 षटकांत 7 विकेटच्या मोबदल्यात 67 धावा केल्या. दुर्गापूरकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱया सर्वोनिल रॉयने 14 रन्समध्ये 3 विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला. दुर्गापूरने 68 धावांचे आव्हान 8 चेंडूआधी 5 विकेट राखून गाठले.
सुप्रिमो क्रिकेटला मालवणी तडका
टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱया सुप्रिमो क्रिकेट स्पर्धेचे आयोजनही वर्ल्ड क्लास असेच आहे. त्यात या क्रिकेटला खास मालवणी तडका मिळालाय. बादल चौधरीच्या अस्सल मालवणीतील कॉमेंट्रीसोबतच वर्ल्ड क्लास कॉमेंट्रीच्या पॅनेलमध्ये प्रशांत आदवडे, चंद्रकांत शेटे, कुणाल दाते, हरीश पंडय़ा, मनीष पाटील, समीर शोमाने यांचा समावेश आहे. प्रत्येक चेंडूगणिक त्याचे अचूक विश्लेषणाला प्रेक्षकांची उत्स्फुर्त दाद मिळत आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण डिजिटल मीडियातही सुरू असून जगभरातून या स्पर्धेला दर्शकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे सामना निरीक्षक म्हणून सुरेश शास्त्राr, मदन सिंग यांची नेमणूक केली आहे. स्पर्धेच्या निवेदनाची जबाबदारी रेश्मा मयेकर आणि विनीत देव पार पाडत आहेत.
चौथा दिवस – सुप्रिमो विक्रम
बबलू पाटीलच्या सुप्रिमो चषकातील 100 धावा पूर्ण. धावांचे शतक गाठणारा 38 वा फलंदाज.
अयुब शेखने ठोकले पहिले अर्धशतक. सुप्रिमो चषकाच्या इतिहासातील हे चौथे वैयक्तिक अर्धशतक होय. याआधी योगेश पवार, मुकेश गोयल, एजाज कुरेशी यांनी अर्धशतक झळकावले होते.
प्रहार पुणे संघाच्या दत्ता पवार आणि महेश नानगुडे या सलामीवीरांची 53 धावांची भागी. सुप्रिमो चषकाचा इतिहासात ही बारावी अर्धशतकी सलामी ठरली.