
<<< नीलेश कुलकर्णी >>>
पोलीस सेवेतून राजकारणात आलेल्या अन्नामलाईंची ‘इमेज’ भाजपच्या भक्त मंडळींनी एखाद्या युगपुरुषासारखी बनवली होती. अन्नामलाई हेच तामीळनाडूसारख्या द्रविडी प्रांतात ‘कमळा’च्या बागा फुलवतील, असे चित्र रंगविण्यात आले होते. मात्र तामीळनाडूच्या राजकारणात सपशेल उताणे पडल्यानंतर विदेशात जाऊन ‘लीडरशिप कशी करावी?’ याचा क्रॅश कोर्स करणाऱ्या अन्नाबाबूंची आता विकेट पडली आहे. अर्थात तामीळनाडूत भाजपचे पुढे काय? हा प्रश्न आज तरी अनुत्तरितच आहे.
अन्नामलाई यांच्याकडे 2011 मध्ये हिंदुत्ववादी राजकारणासाठी पोषक नसलेल्या तामीळनाडूची धुरा देण्यात आली होती. या राज्यात भाजपला स्वबळावर सत्तेत आणण्याचा संकल्प अन्नामलाई यांनी सोडला होता. प्रत्यक्षात लोकसभेला ते स्वतःची सीट वाचवू शकले नाहीत. अन्नामलाई यांच्या फाजील आत्मविश्वासापोटी भाजपने अण्णा द्रमुक या जुन्या मित्रपक्षाशी नाते तोडले आणि स्वतःची चूल मांडली. मात्र तामीळनाडूत अण्णा द्रमुकशिवाय डाळ शिजणार नाही याची खात्री पटल्यानंतर आता अण्णा द्रमकला अनुरूप असा नवा प्रदेशाध्यक्ष नेमून ‘नवा गडी नवे राज्य’ सुरू होईल. सोशल मीडियाला हाताशी धरून नेते बनणाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. अन्नामलाई हे अशाच ‘स्वयंघोषित सिंघम’प्रमाणे वावरत होते.
तामीळनाडूतील द्रमुक हा पक्ष सध्या दिल्लीकरांच्या मार्गातील मोठा अडथळा बनला आहे. एकतर संसदेत द्रमुक ‘मॅनेज’ न होता सरकारविरोधात लढत राहतो. दुसरीकडे लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन व हिंदी भाषेच्या सक्तीवरून द्रमुकने भाजपच्या तोंडाला फेस आणला आहे. भाजप हा पक्ष दाक्षिणात्य अस्मितेच्या विरोधात आहे, असे नरेटिव्ह रचण्यात द्रमुकचे सर्वेसर्वा व तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे यशस्वी झाले आहेत. परिसीमनविरोधात त्यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याचा खटाटोप सुरू केला आहे. त्यात एनडीएचे घटक पक्ष असलेले चंद्राबाबूही आहेत. राष्ट्रीय राजकारणात दक्षिणेचा संकोच करून उत्तरेला झुकते माप दिले जात असल्याचा स्टॅलिन यांचा आक्षेप आहे. कदाचित याच मुद्द्यावरून तामीळनाडूच्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही स्टॅलिन बाजी मारून जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. द्रमुकचे मोठ्या संख्येने लोकसभा खासदार आहेत व ते एकजूट आहेत. त्यामुळे ते मोदी सरकारची लोकसभेत डोकेदुखी वाढवतात. त्यामुळे येनकेनप्रकारेण स्टॅलिन व द्रमुकला सत्तेतून बेदखल करण्याची योजना दिल्लीकरांनी बनवली आहे. तामीळनाडूत भाजप औषधाएवढीही नाही, हे दिल्लीकरांना ठाऊक आहे. त्यात मोठ्या अपेक्षेने प्रदेशाध्यक्ष बनवलेले अन्नामलाई हे नेतेगिरीपेक्षा ‘रीलगिरी’मध्येच अधिक व्यस्त असल्याने पक्षाचे हसू झाले आहे. अशा स्थितीत एकट्याने लढून द्रमुक सत्तेतून कदापि हटणार नाही, हे लक्षात आल्यानंतर अमित शहा यांनी अण्णा द्रमुकचे नेते पलानीस्वामी यांची भेट घेऊन युतीसाठी हात पुढे केला. दुसरीकडे तामीळ अभिनेता विजय यांनी ‘टीव्हीके’ नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षासोबतही हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. द्रमुकविरोधातील मतांची फाटाफूट न होऊ देता द्रमुकच्या सत्तेला छेद देण्याचे प्रयत्न आहेत. त्यात अन्नामलाईंसारख्यांची ‘आहुती’ ही पडणारच होती.
‘आप’ की याद!
राजधानीत भाजपच्या रेखा गुप्ता मुख्यमंत्री होऊन जेमतेम दोन महिने होत नाहीत तोच लोकांना आता आम आदमी पार्टीची आठवण येऊ लागली आहे. रेखा गुप्ता यांना स्थिरस्थावर होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी पुरेसा नाही हे मान्यच. त्या काही गोष्टी प्रामाणिकपणे करत आहेत. मुख्य म्हणजे जनतेमध्ये मिसळत आहेत ही जमेची बाब. मात्र तरीही दिल्लीकरांच्या समस्या काही सुटताना दिसत नाहीत. दिल्लीत हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला तरी प्रदूषणाची पातळी काही कमी झालेली नाही. हवा प्रदूषण हा भाजपने निवडणुकीत मोठा मुद्दा बनवला होता. त्याचबरोबर दिल्लीत उन्हाचा पारा टिपेला पोहोचत असताना आणि लूची लाट आलेली असताना वीजकपातीमुळे दिल्लीकर हैराण आहेत. दिल्लीच्या अनेक भागांत पाच-पाच तास लाईट गायब असते. दिल्लीच्या रस्त्यात अनेक बसथांब्यांवर आबालवृद्ध डीटीसीच्या बसेसची वाट पाहताना दिसत आहेत. हे चित्र निश्चितच भूषणावह नाही. ‘आप’चे सरकार गेल्यानंतर खासगी शाळांनी फीमध्ये 20 ते 80 टक्क्यांपर्यंत मनमानी पद्धतीने वाढ केली आहे. दिल्लीत ‘आप’चे सरकार म्हणजे काही रामराज्य नव्हते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. ‘आप’ची ढोंगबाजी लक्षात आल्यानंतर जनतेने त्या पक्षालाही सत्तेवरून खाली खेचले आणि मोठ्या अपेक्षेने भाजपकडे सत्तेची सूत्रे दिली. निवडणुकीच्या काळात भाजपने केजरीवालांना खाली खेचण्यासाठी वाट्टेल ती आश्वासने दिली. आता ती सगळी जरी पाळता आली नाहीत तरी किमान जनता ‘त्राही भगवान’ होणार नाही, याची दक्षता भाजपला घ्यावी लागेल.
मोदींचा ‘अवतार’
नरेंद्र मोदी हे ‘अवतारी पुरुष’ आहेत किंवा साक्षात परमेश्वराचाच अवतार आहे, ही अंधभक्तांची अंधश्रद्धा आहे. वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कम खासदार कंगना राणावत यांनी नरेंद्र मोदी हे अवतार असून ते पंतप्रधानपदी आरूढ झाल्यापासूनच खऱ्या अर्थाने देशाचा विकास सुरू झाला, असे अकलेचे तारे तोडले आहेत. 2014 पूर्वी मी मतदान करत नसायचे. राजकारण्यांबद्दल मनात तिटकारा होता. मोदी आल्यापासून हे सगळे बदलले, अशी कुस्तीही या महान विदुषींनी जोडली आहे. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी हा देश कंदिल-दिव्यांवर होता आणि बैलगाडी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते, असेच कंगना यांना सुचवायचे असावे. या देशातल्या विकासाचे सर्वच मैलाचे दगड हे 2014 पूर्वीचे आहेत आणि देशाच्या विकासात आजवरच्या सगळ्याच पंतप्रधानांचे कमीअधिक योगदान नक्कीच आहे. वेगवेगळी विधाने करण्यात पटाईत असल्याने कंगना यांना खासदार झाल्यापासून ‘मुंह मत खोलो’ अशी तंबी पक्षनेतृत्वाकडून देण्यात आली होती. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला भेटीची वेळ देत नाहीत, असा तक्रारवजा सूर कंगना यांनी लावला होता. मोदींनी भेटीचा वेळ द्यावा, यासाठी तर ही अवताराची मखलाशी नाही ना?