supremo chashak 2025 – बालाजीचा धमाका, एंजलचा बार फुसका; दणदणीत विजयासह बालाजी क्लब उपांत्य फेरीत

प्रदीप पाटीलच्या 17 चेंडूंतील 29 धावांच्या खेळीने बालाजी क्लबने उपांत्यपूर्व फेरीत कोलकात्याच्या एंजल धमाकाचा खेळ फुसका केला आणि सुप्रिमो चषकाच्या 11 व्या मोसमाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 17 धावांत एंजल धमाका संघाचे 4 फलंदाज बाद करणारा इमरोज खान बालाजी क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याआधी बालाजी क्लबने सिंधुदुर्गच्या दीपकदादा प्रतिष्ठानचा 4 विकेटनी तर एजल धमाकाने विक्रोलियन्स रोहित इलेव्हनचा 19 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

एकीकडे आयपीएलच्या थरार सुरू असतानाही ‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ असलेल्या सुप्रिमो चषक स्पर्धेलाही प्रेक्षकांचा लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद आयोजक विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस आणि विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या कल्पकतेला-मेहनतीला मिळालेली पावती आहे. घडय़ाळाचे काटे दोनच्या पुढे गेले तरी प्रेक्षकांनी सुप्रिमोची जागा सोडली नाही. क्रिकेटवेडय़ांना शेवटच्या षटकापर्यंत बांधून ठेवणाऱ्या या सामन्यात बालाजीच्या प्रदीप पाटीलची चौकार-षटकारांची आतषबाजी क्रिकेटप्रेमींसाठी धमाकेदार ठरली.

एंजल धमाका संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सरोज प्रामाणिक आणि जगत सरकारने 21 धावांची सलामी दिली. जगत 17 धावांवर बाद झाला, पण सरोजने 2 षटकार आणि 2 चौकार खेचत 15 चेंडूंत 27 धावा ठोकल्या. तो बाद झाल्यानंतर एंजलच्या एकाही फलंदाजाला संघाची धावसंख्येला वेग देता आले नाही. इमरोजने तळाच्या 4 फलंदाजांना बाद करत एंजलला 8 बाद 67 धावांवरच रोखले. त्यानंतर 68 धावांचा पाठलाग करताना फरदीन काझी आणि प्रदीप पाटीलच्या फटकेबाजीने बालाजीला 10 चेंडू आणि 7 विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

n पहिल्या फेरीत बालाजी क्लबने फरदीन काझीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर सिंधुदुर्गच्या दीपकदादा प्रतिष्ठान ग्लोरियस मैत्री संघाचा 13 धावांनी पराभव केला. बालाजी क्लबने 8 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात 72 धावा केल्या. प्रतिस्पर्धी ग्लोरियस मैत्रीसंघाने 8 षटकांत 6 विकेटच्या मोबदल्यात अवघ्या 59 धावा केल्या.

n कोलकात्याच्या एजंल धमाकाने पहिल्या फेरीत मुंबईच्या विक्रोलीयन्स रोहित इलेव्हनचा 29 धावांनी पराभव केला. एजंल धमाकाने 8 षटकांत 6 विकेटच्या मोबदल्यात 86 धावा केल्या. एंजलच्या संजू कनोजियाने 9 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासहित 21 धावा केल्या. विक्रोळीयन्स रोहित इलेव्हनने 8 षटकांत 7 विकेटच्या मोबदल्यात 57 धावा केल्या.

n पुण्याच्या डिंग डाँग संघाने यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेची फायनल 13 एप्रिल रोजी होणार आहे. विजेत्या संघाला 12 लाख रुपये आणि संघातील प्रत्येकाला बाईक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे यंदाचे 11 वे वर्ष आहे.

दिवस दुसरा ः सुप्रिमो विक्रम

n सुमित ढेकळेने आज पहिल्या सामन्यात 25 धावा करताना सुप्रिमो चषकातील आपल्या धावा 315 वर नेत कृष्णा सातपुतेच्या सर्वोच्च 315 धावांची बरोबरी साधली. सुप्रिमो चषकात सर्वाधिक धावा करणारा कोण, याचा फैसला आता उपांत्य फेरीच्या सामन्यातच कळू शकेल.

n सिंधुदुर्ग संघाच्या बाबल नाईकने आज सुप्रिमो चषकात पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. तो पदार्पणात पहिल्यावहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा सहावा फलंदाज ठरला, तर एंजल धमाका (कोलकाता) संघाच्या शिवम पंबोजनेही पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत सातवा फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला.

n बालाजी क्लबच्या इमरोज खानने आज दोन सामन्यांत एकूण पाच विकेट टिपत सुप्रिमो चषकातील आपल्या बळींची संख्या 29 वर नेली आणि त्याने सर्वाधिक विकेट टिपणाऱ्या अनिकेत सानपला (27) मागे टाकले.

n इमरोज खानने सुप्रिमो चषकात दुसऱ्यांदा एका डावात चार विकेट बाद केले. सुप्रिमो चषकात एका डावात चार विकेट बाद करण्याची ही 35 वी वेळ आहे.

n जगत सरकार आणि फरदीन खाजी यांनी सुप्रिमो चषकाच्या कारकीर्दीत आपल्या वैयक्तिक 50 धावा आज पूर्ण केल्या.

n विक्रोलीयन्स संघाच्या मंगेश वैतीने वैयक्तिक 42 धावा करताना सुप्रिमो चषकात एका डावात 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला. सुप्रिमो चषकात 40 पेक्षा अधिक धावा करणारा इमरोज 16 वा फलंदाज ठरला आहे.