
घाटकोपरच्या भटवाडी मैदानात जागा बळकावून त्यावर समाज मंदिराचे बांधकाम करण्यात येणार असून या समाज मंदिरासाठी भाजप खासदार मनोज कोटक यांनी प्रशासनाकडे शिफारस केल्याचा दावा करत या प्रकरणी एका मंडळाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मैदानातील बेकायदा बांधकाम हटवण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली असून युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने बेकायदा बांधकाम तोडायचे की नाही याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे.
घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी मैदानात अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळच्या वतीने समाजकल्याण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. भाजप खासदार मनोज कोटक यांनी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग निधी) अंतर्गत प्रशासनाला बांधकामाची शिफारस केली असून जिल्हा नियोजन अधिकाऱयांनी त्याकरिता 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र हे समाजकल्याण मैदानाची जागा हडपून बेकायदा उभारण्यात येत असल्याचा दावा करत स्नेहदीप क्रीडा मंडळाच्या वतीने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मैदान पूर्वीप्रमाणे होते तसे करण्याचे प्रशासनाला आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत त्याबाबतचा निकाल राखून ठेवला.