
खासगी आराम बसमध्ये बँग लिफ्टींग करून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून पोलिसांनी कारही जप्त केली आहे. जाहीर निजामुद्दीन खान, जाहीर आयुव खान, रव्दर सोजर हुसैन, रफिक नियाज खान अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, संशयित आरोपींना कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासगी आराम बसमधून काही जण बॅग लिफ्टिंग करून त्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास करीत होते. चोरीप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एलसीबीने दोन पथके तयार केली होती. गुरुवारी रात्री ही पथके कणकवली हद्दीत गस्ती घालत असताना गुप्त बातमीदारांकडून असलदे येथील हॉटेल ग्रीनफिल्ड येथे चार व्यक्ती संशयित वावरत असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले.
कारची तपासणी केली असता पोलिसांना चार बनावट नंबरप्लेट मिळून आल्या. त्यानंतर चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी आराम खासगी बसमध्ये बँग लिफ्टींग करून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. त्यांनी यापूर्वी मुंबई गोवा-हायवेवर कणकवली येथील असलदे, नांदगाव, ओसरगांव येथे लक्झरी बसमधून बँग लिफ्टींग करुन सोने आणि रोख रक्कम चोरुन घेऊन गेल्याचे त्यांनी कबुल केले.
या टोळीने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आराम बसेस थांबा असलेल्या हॉटेलच्या टिकाणी बसमधील प्रवाशांच्या बॅगांची, रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची चोरल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.