महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतींच्या पायाशीही स्थान मिळणार नाही, संजय राऊत यांचं अमित शहांवर टिकास्त्र

केंद्रीय मंत्री अमित शहा 12 एप्रिल रोजी किल्ले रायगडला भेट देणार आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

शुक्रवारी सकाळी माध्यम प्रतिनिधिंनी राऊत यांना अमित शहा यांच्या रायगड दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘रायगडला भेट देणार आहेत, पण पुढे काय. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच आशीर्वाद देणार नाहीत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न पाहिले, मुंबई लुटण्याचे स्वप्न पाहिले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र कमजोर केला त्यांना छत्रपतींच्या पायाशीही स्थान मिळणार नाही.’

दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा पाहुणचार घेणार आहेत. याचाही राऊत यांनी खास शैलीत समाचार घेतला. ज्यांच्या प्रेरणेतून गद्दारीची ही बिजं रोवली त्यांच्या घरी जाऊन कुणी जेवणार असेल तर ते स्वागतार्ह आहे. तिथे मन की बात होऊ द्या. अजित पवार त्यांचे नेते नाहीत, शिंदेंचेही नेते अमित शहा आहेत. हे सगळे घडवणारे तेच आहेत. शहा नसते तर हा पक्ष फुटला नसता, शहा नसते तर त्यांना पक्ष आणि घड्याळ चिन्हही नसते मिळाले. करते सवरते तेच आहेत, असे राऊत म्हणाले.

मुंबईतील चेंबूरमध्ये गोळीबाराची घटना घडली. तत्पूर्वी नागपूरमध्येही गोळीबार झाला. छत्रपती संभाजी नगरमध्ये महिला, तरुणींच्या शरीराला स्पर्श करून तरुण जाताहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, बहुतेक ती पाहण्यासाठीच अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहोत हे फडणवीस यांना बहुतेक लक्षात आलेले नाही. नागपूर, मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महिलांवर अत्याचार होताहेत, गोळीबार खून होताहेत, अपहरण होताहेत आणि मस्तमौला राजकारण करत फिरताहेत, असे राऊत म्हणाले.

कुलभूषण जाधव यांना सोडवू शकले नाहीत याचे आणि पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्या, संजय राऊत यांचा घणाघात