अभय कुरुंदकरला आज शिक्षा ठोठावणार, पनवेल न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला उद्या पनवेल जिल्हा न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. पोलीस दलाला सर्वाधिक बदनाम करणाऱ्या या खटल्यात आरोपीला कोणती शिक्षा मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अश्विनी यांची हत्या 11 एप्रिल 2016 रोजी झाली होती. त्याच तारखेला म्हणजे 11 एप्रिल 2025 रोजी कुरुंदकरला पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे शिक्षा सुनावणार आहेत.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा खटला अलिबाग आणि पनवेल जिल्हा न्यायालयात 2019 मध्ये उभा राहिल्यानंतर मॅरेथॉन सुनावणी झाली. हा खटला पनवेल न्यायालयात वर्ग झाल्यानंतर महिन्यातील 4 दिवस सुनावणीसाठी ठेवण्यात आले. खटल्यात सुमारे 84 साक्षीदार न्यायालयाने तपासले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपींचे वकील विशाल भानुशाली यांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने हा खटला निकालासाठी टाकला. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीमध्ये मुख्य आरोपी याला भादवि कलम 302 नुसार दोषी ठरवण्यात आले, तर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा ठपका ठेवण्यात आला. पुराव्याअभावी राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या तिन्ही आरोपींना उद्या शिक्षा ठोठावली जाणार आहे.

तांत्रिक पुराव्याने ठरवले दोषी
अभय कुरुंदकर हा पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याने या खटल्यात कोणताच पुरावा मागे ठेवला नव्हता. अश्विनी यांच्या मृतदेहाचे लाकडे कापण्याच्या करवतीने छोटे छोटे तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिले होते. मात्र तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी या गुन्ह्यात तांत्रिक पुरावे जमा केले. त्यामुळे खून केल्यानंतर उजळ माथ्याने फिरणाऱ्या कुरुंदकरच्या पापाचा घडा अखेर भरला. या निकालामुळे कुरुंदकरला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्येही वाढ होणार असल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू झाली आहे.