मिंध्यांना ‘डोळा’ मारणाऱ्या भाजपमधील ‘गद्दारां’ची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार, ठाण्यातील तडजोडबाजांची लिस्ट देणार

मिंध्यांनी भ्रष्टाचाराने पोखरलेली ठाणे महापालिका एक हाती घ्यायची यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. मात्र या प्रयत्नांना भाजपमधीलच काही ‘गद्दार’ सुरुंग लावत असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत मिंधे गटाला कसा फायदा होईल यासाठी एक गट प्रयत्न करत असून या सेटलमेंट बाजांच्या नावाची लिस्टच तयार करण्यात आली आहे. मिंध्यांना डोळा मारणाऱ्या या तडजोड बाजांची तक्रार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असल्याची चर्चा आहे. काही निष्ठावंत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमदारांकडे मागणी केली असल्याची माहिती दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी ठाण्यात स्वबळावर लढण्याचे भाजपने जवळपास निश्चित केले आहे. भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभाग स्तरावर आणि बूथ लेव्हलला काम करण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनादेखील कामाला लागण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. ठाण्यात भाजपने अनुभवी लोकांकडे पालिका निवडणुकीची धुरा देण्यात येणार असून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येणार आहे, असे असताना काही महाभाग मिंधे गटाच्या जवळचे असल्याने पक्षातील सविस्तर माहिती पोहोचवतात. तसेच निवडणूक काळात तिकीट कट करून आयारामांना ते देणे, उमेदवारी घेऊनही प्रचारात सक्रिय सहभाग न घेणे, निवडणुकीत तडजोड करणे, अशा प्रकारची पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पालिकेच्या इतिहासात भाजप आणि मिंधे गटातील काही नेत्यांची मैत्री लपून राहिलेली नाही. पालिकेतील कोणतेही पद असो किंवा एखादा महत्वाच्या विषयावर तडजोड केली गेली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून पक्षवाढीसाठी काम करायचे आणि काही नेते गद्दारी करणार असतील तर योग्य नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आता प्रत्येक प्रभागात उमेदवार
मिंधे गटाशी अंतर्गत सलगी करायची आणि ऐन निवडणुकीत तडजोड करायची, अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या सर्व नेत्यांना निवडणुकीपासून लांब ठेवा अशी मागणीच भाजपच्या आमदारांकडे केली आहे. पूर्वी भाजपकडे उमेदवारांची वानवा होती. मात्र आता प्रत्येक प्रभागात उमेदवार असून सर्व इच्छुकांना संधी मिळायला हवी, अशी भावना या पदाधिकाऱ्यांनी आमदारांकडे व्यक्त केली आहे.