वर्ष लोटल्यानंतरही तारघर, गव्हाण रेल्वे स्थानक सुरू होईना; नेरुळ-उरणच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप

उरण नेरूळ रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होऊन 15 महिने लोटले असले तरी तारघर आणि गव्हाण रेल्वे स्थानक सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. किरकोळ काम अपूर्ण असल्याने या दोन्ही रेल्वे स्थानकांची रखडपट्टी झाल्यानंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उरण-नेरुळ रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा सहा वर्षांपूर्वी सुरू झाला. सुरुवातीला लोकल गाड्यांची वाहतूक नेरूळ आणि बेलापूरपासून खारकोपरपर्यंत होत होती. नंतर मध्य रेल्वे प्रशासनाने खारकोपर ते उरणदरम्यानचे काम पूर्ण केले. या मार्गावरील सर्वच चाचण्या पूर्ण झाल्यानंतर 15 महिन्यांपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील या मार्गावर लोकल गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात आली. नेरूळ-उरण ही लोकल सेवा सुरू झाली असली तरी तारघर आणि गव्हाण ही रेल्वे स्थानके अद्यापही सुरू झालेली नाहीत. पहिल्या टप्प्यातील तारघर तर दुसऱ्या टप्प्यातील गव्हाण या दोन स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे या दोन्ही स्थानकात लोकल अद्यापही थांबत नसल्याने हजारो प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या कामामुळे होणाऱ्या दिरंगाईमुळे मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे

दोन महिन्यांत काम सुरू होईल तारघर आणि गव्हाण या दोन्ही स्थानकांतील फिनिशिंगची कामे अद्यापही अपूर्णच आहेत. त्यामुळे या दोन्ही स्थानकांत लोकल थांबण्यासाठी व प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रवाशांना आणखी किमान दोन महिने तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली आहे