विद्यापीठाच्या क्रीडा संकुलासह सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा एक कार्यक्रम मुंबई विद्यापीठातील क्रीडा संकुलात आहे. मात्र क्रीडा संकुलाची इमारती जुनी आणि धोकादायक बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुलासह विद्यापीठातील सर्व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील क्रीडा संकुलात फेब्रुवारीत खेळाच्या स्पर्धा सुरू होत्या. त्यावेळी केवळ लाऊडस्पीकरच्या आवाजाने छताचा कोपरा कोसळला. याबाबत आम्ही राजभवनासह कुलगुरूंकडेही तक्रार केली होती, परंतु दुरुस्ती न करता तात्पुरती रंगरंगोटी करण्यात येत आहे.

मुळात या क्रीडा संकुलासह कॅम्पसमधील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. परंतु विद्यापीठ प्रशासन याकडे गंभीरतेने पाहत नाही. त्यामुळे कुलपती म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, किसन सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, व्यवस्थापन परिषद सदस्या शीतल शेठ-देवरुखकर यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुळकर्णी यांना देण्यात आली आहे.