
भूमिगत मेट्रो-3 च्या खोदकामासाठी पालिकेने आझाद मैदानाजवळील ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर चौकाचे नामफलक हटवले होते. आता हे काम पूर्णत्वाकडे असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. तरीदेखील पालिकेकडून हा फलक पुन्हा बसवण्यास दिरंगाई केली जात आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले ‘दर्पण’ नावाचे नियतकालिक प्रसिद्ध केले. जांभेकर यांचे मुंबईत काळबादेवी विभागात वास्तव्य होते. बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय इमारत आणि आझाद मैदान महापालिका मार्ग यांना छेदणाऱया चौकास ‘दर्पण’कार बाळशास्त्राr जांभेकर यांचे नाव द्यावे यासाठी बाळाशास्त्राr जांभेकर जीवनचरित्राचे अभ्यासक भाऊ सावंत यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर या चौकातील ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर चौक या नामफलकाचे अनावरण 17 मे 2005 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते झाले होते.
तीन वर्षांपूर्वी मेट्रो-3 च्या खोदकामासाठी या चौकातील नामफलक हटवण्यात आले, परंतु काम पूर्ण होऊन या रस्त्यावर वाहतूक पूर्ववत झाली तरी पालिकेच्या ए वॉर्डने अद्याप नामफलकाची पाटी बसवली नाही. ए वॉर्डकडून होणाऱया या दिरंगाईबाबत मुंबई मराठी पत्रकार संघाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे. तसेच हा नामफलक लवकर बसवण्याची मागणी केली आहे.