चेन्नईसाठी वाईट अन् गोड बातमी, ऋतुराजच्या दुखापतीमुळे धोनीकडे नेतृत्व

चेन्नई सुपर किंग्जला एकाच क्षणी वाईट आणि गोड बातमीचा अनुभव आला. चेन्नईचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज असलेला ऋतुराज गायकवाड हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आली, तर दुसऱ्या क्षणाला ऋतुराजच्या जागी पुन्हा एकदा ‘पॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे कर्णधारपद सांभाळणार असल्याची बातमी कळताच धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाला उधाण आलेय. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी चेन्नईचे नेतृत्व सोडणाऱ्या धोनीच्या हाती पुन्हा एकदा ती जबाबदारी आली आहे.

गेल्या महिन्यात 30 मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ऋतुराजच्या डाव्या हाताच्या कोपरावर गोलंदाज तुषार देशपांडेचा चेंडू जोरात आदळला होता. चेंडूचा वेग इतका होता की, ऋतुराज अक्षरशः कळवळला आणि वेदनेने खाली बसला होता. या वेदनेनंतरही त्याने आपली फलंदाजी सुरू ठेवली आणि अर्धशतकही झळकावले होते. त्याने 63 धावांची दमदार खेळी साकारत संघाला विजयी ट्रकवर नेले होते. मात्र तो बाद झाल्यानंतर धोनीला विजयी लक्ष्य गाठता आले नाही आणि चेन्नईने हा सामना 6 धावांनी गमावला. पहिल्या तीन सामन्यांत 53, 0, 63 अशा खेळी करणाऱ्या ऋतुराजला गेल्या दोन डावात 1 आणि 5 धावा करता आल्या. आता त्याची दुखापत काहीशी गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला उर्वरित मोसमाला मुकावे लागणार असल्याचे चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने सोशल मीडियावर जाहीर केले.

धोनीचे नेतृत्व पणाला

गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईला गेल्या मोसमातही फार चांगली कामगिरी करता आली नव्हती तर या मोसमातही चेन्नई पराभवाचा चौकार ठोकणारा पहिला संघ ठरला आहे. आता धोनीकडे नेतृत्व आल्यामुळे उर्वरित 9 पैकी किमान सात सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्याआधी प्ले ऑफचे आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नईला आपल्या पराभवाची मालिका खंडित करावी लागणार आहे. जर कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात चेन्नई जिंकला नाही तर त्यांचे साखळीत बाद होण्याचे संकट आणखी गहिरे होईल.

Sai Sudarshan – गेल, हेडचा रेकॉर्ड मोडला; विराट, रोहित जवळपासही नाही, साई सुदर्शनचा ऐतिहासिक कारनामा

चेन्नईला पुन्हा एकदा धोनी नेतृत्वस्पर्श

ऋतुराजच्या दुखापतीनंतर चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने उर्वरित आयपीएलमध्ये नेतृत्व करण्यासाठी धोनीला गळ घातली आणि त्याने ती जबाबदारी मानाने स्वीकारलीसुद्धा. धोनीने 2008 सालापासून 2023 पर्यंत या संघाचे नेतृत्व करताना पाचवेळा चेन्नईला विजेतेपद जिंकून दिले आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 साली जेतेपद पटकावले आहे. मात्र त्यानंतर आयपीएल 2024 पूर्वी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले होते. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नई गेला मोसम खेळला, पण या मोसमात त्याच्या नेतृत्वाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. गेल्या वर्षी चेन्नईने सात विजय आणि सात पराभव सहन करावे लागले होते. या कामगिरीमुळे त्यांचा संघ साखळीतच बाद झाला होता.