
यजमान हिंदुस्थानी संघाने हाँगकाँग-चायना संघाचा 2-1 फरकाने पराभव करून सलग दुसऱ्या विजयासह बिली जीन किंग कप आशिया ओशियाना गट 1 महिला टेनिस स्पर्धेत तिसऱ्या दिवशी आपली आगेकूच कायम राखली. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या एकेरीच्या लढतीत हिंदुस्थानच्या जागतिक क्रमवारीत 364 व्या स्थानी असलेल्या वैदेही चौधरी हिने हाँगकाँगच्या जागतिक क्र. 757 असलेल्या हो चिंग वू हीचा टायब्रेकमध्ये 7-6(8), 6-1 असा पराभव करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. दुसऱ्या एकेरीच्या लढतीत सर्व टेनिसप्रेमींची फेव्हरेट असलेल्या हिंदुस्थानच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती हिने हाँगकाँगच्या हाँग यी कोडी वांगचा 7-6(6), 2-6, 6-3 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम राखली. हा सामना 2 तास 27 मिनिटे चालला. दुहेरीच्या औपचारिक लढतीत हाँगकाँगच्या हाँग यी कोडी वांग व मॅन यिंग मॅगी एनजी या जोडीने हिंदुस्थानच्या अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे यांचा 6-7 (2), 6-3, 13-11 असा पराभव केला.