
सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे चंद्रहार पाटील असतानाही स्थानिक कॉँग्रेसच्या नेत्यांनी पडद्यामागू विशाल पाटील यांना मदत करून निवडून आणले. आता त्याच विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून त्यासाठी त्यांनी उघडपणे पक्षबदलाची तयारी दर्शवली आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यावर विशाल पाटील यांनी कॉँग्रेससोबत असल्याचे सांगत ‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. मागील काही महिन्यांपासून भाजपने त्यांच्यासाठी गळ टाकून आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला होता. दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात विशाल पाटील यांनी भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. जयकुमार गोरे यांना जसे मंत्रीपद मिळाले तसे मलादेखील मिळेल, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे आता काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी दिली होती ऑफर
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच सांगलीत एका पत्रकार परिषदेत खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तसेच आमच्याकडे या, विकासासाठी निधी आणि पद मिळेल, असे म्हटले होते, पण यावर योग्य वेळ आल्यावर यावर उत्तर देऊ, असे सांगत विशाल पाटील यांनी वेळ मारून नेली होती.