टँकर संपाने मुंबईत पाणीबाणी, लोकांचे हाल… महापालिकेचे अधिकारी सुट्टीत मस्त

कडक उन्हाच्या झळांनी मुंबईकरांचा घामटा निघत असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आटून आता 32 टक्क्यांवर आला आहे. त्यात विविध प्रकल्प, बांधकामे, मेट्रो, कोस्टल रोड, मॉल यांच्यासह गृहनिर्माण संस्थांना पाणीपुरवठा करणारे सुमारे 1800 टँकर्स आजपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे मुंबईत ‘पाणीबाणी’चे संकट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे राज्य आणि पालिकेचे अधिकारी सुट्टीवर असून मुंबईचा पाणीप्रश्न सोडवण्याबाबत राज्य सरकार उदासीन आहे, असा आरोप टँकर्स असोसिएशनने केला आहे.

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने मुंबईतील विहिरी आणि बोअरवेल मालकांना पालिकेची एनओसी घेणे बंधनकारक केले आहे. मात्र एनओसी मिळवण्यासाठी विहिरीभोवतीची दोन हजार फुटांची जागा मोकळी सोडावी, पाणी भरताना टँकर्स सोसायटी किंवा चाळीजवळ उभे करू नयेत, पाण्याचे पूर्ण वर्षाचे पैसे आगाऊ भरावेत, टँकर्सवर मीटर बसवावेत, रेन वॉर्टर हार्वेस्टिंग करावे यासह इतर अटी आहेत, मात्र यातील पहिल्या दोन अटींमुळेच टँकर्सचालक संतापले असून त्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.

– मुंबई टँकर्स असोसिएशनकडून 1800 टँकर्समधून दरदिवशी विविध कामांसाठी सुमारे 300 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमातून केला जातो. हे सर्व पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरले जाते.

मंगळवारपर्यंत तोडगा नाही

मुंबई महापालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नियम काही प्रमाणात शिथिल करावेत या मागणीसाठी मुंबईतील वॉटर टँकर्सचालक बेमुदत संपावर गेले आहेत. मुंबई टँकर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयां-बरोबर राज्य सरकारने अद्याप कोणताही संपर्क केलेला नाही आणि त्यांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. सरकारने केवळ ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सलग चार दिवस सुट्टय़ांमुळे राज्य आणि पालिकेचे अधिकारी मुंबईबाहेर असून याबाबतचा निर्णय आता मंगळवारीच होण्याची शक्यता आहे.

मुंबईला राखीव पाणी

मुंबईवर असलेल्या पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून राज्य सरकारच्या उर्ध्व वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर, उर्ध्व वैतरणा आणि भातसामधील राखीव साठय़ातील पाणी मुंबई महापालिकेला देण्याची मागणी तत्त्वतः मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उर्ध्व वैतरणामधून 68 हजार दशलक्ष लीटर आणि भातसामधून 1 लाख 13 हजार दशलक्ष लीटर असा राखीव कोटय़ातील जलसाठा उपलब्ध होणार आहे.