राणा स्मॉल प्लेयर, हेडलीचे प्रत्यार्पण का नाही? माजी गृह सचिव जी.के.पिल्लई यांची अमेरिकेच्या भूमिकेवर शंका

तहव्वूर राणा हा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील स्मॉल प्लेयर आहे. परंतु संपूर्ण हल्ल्याचे षड्यंत्र रचणारा डेव्हिड कोलमन हेडली याचे काय? त्याला अमेरिकेचे संरक्षण आहे. अमेरिका हेडलीचे प्रत्यार्पण का करत नाही, असा सवाल हिंदुस्थानचे माजी गृह सचिव जी.के. पिल्लई यांनी केला आहे. अमेरिकेने चांगल्या भावनेने केलेले नाही. दहशतवादी हल्ल्याच्या कटाबाबत माहीत असूनही त्यांनी राणाचा शाळेपासूनचा मित्र आणि मुंबईवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडलीला हिंदुस्थानविरोधी कारवाया सुरूच ठेवण्याची परवानगी दिली, असा आरोपही पिल्लई यांनी केला आहे. दरम्यान, राणा हिंदुस्थानात दोषीच ठरेल. त्याला फाशीच होईल, असा विश्वासही पिल्लई यांनी व्यक्त केला. मुंबईवरील हल्ल्यानंतरही हेडली पुन्हा मुंबईत आला होता. जर आपल्याला माहीत असते की तो मुंबईवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे तर त्याला मुंबईतच अटक करता आली असती. त्यामुळे या प्रकरणी अमेरिकेचीच भावना चांगली नव्हती, असा आरोप पिल्लई यांनी केला आहे. यावरून अमेरिकन लोक केवळ त्यांच्या हिताच्याच गोष्टी करतात, त्यांना कुणाचीच पर्वा नाही हे सिद्ध होते, असेही पिल्लई यांनी म्हटले आहे. हेडलीला हिंदुस्थानात येण्यासाठी राणाने केवळ कायदेशीर कव्हर दिले. मात्र हेडलीने दहशतवाद्यांना घेऊन येणारी नौका आणि त्यांची मुंबईत उतरण्याची जागा याची रेकी केली होती. याबाबत आयएसआयलाही माहिती दिली होती, असे पिल्लई यांनी म्हटले आहे. दरम्यान, पिल्लई यांच्या कार्यकाळातच ऑक्टोबर 2009मध्ये हेडली आणि राणा या दोघांना अटक केली होती.