एक मासा पकडला, मग दुसरा पकडण्याच्या नादात तरुण जीव गमावून बसला

मासे पकडण्यासाठी तलावात गेलेल्या तरुणाला मासे पकडणे जीवावर बेतले आहे. मासा पकडण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाला. मणिगंदन असे मयत तरुणाचे नाव असून रोजंदारीवर मासे पकडण्याचे काम करत असे.

तामिळनाडूतील आरायपक्कम गावातील रहिवासी असलेला मणिगंदन हा मंगळवारी कीझवलम तलावात मासे पकडायला उतरला. मणिगंदनने पाणटोंगाई मासा पकडला. त्याचवेळी त्याला दुसरा मासा दिसला. दुसरा मासा हातातून जाऊन नये म्हणून त्याने पहिला मासा तोंडात पकडला आणि दुसरा पकडायला गेला. यावेळी तोंडात पकडलेला घशात गेला आणि श्वास गुदमरल्यामुळे मणिगंदनचा मृत्यू झाला.

मणिगंदनच्या घशात मासा अडकल्याचे पाहून आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. लोकांनी मणिगंदनला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेले, परंतु त्याला मृत घोषित करण्यात आले.