पीएफ काढण्यासाठी एचआरची गरज नाही

ईपीएफओच्या प्रत्येक सदस्याला कंपनीच्या एचआरकडून युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) दिला जातो. पीएफची रक्कम काढण्यासाठी यूएएन नंबरचा उपयोग होतो. मात्र आता पीएफची रक्कम काढण्यासाठी एचआरची गरज लागणार नाही. ईपीएफओ सदस्य ‘उमंग’ ऍपच्या सहाय्याने स्वतःच यूएएन नंबर जनरेट करू शकतो आणि ईपीएफओच्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतो. ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडच्या सर्व सेवा आता सरकारच्या ‘उमंग’ ऍपच्या माध्यमातून मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहेत. उमंग ऍपवरून कर्मचारी स्वतःच यूएएन नंबर जनरेट करू शकतात. ‘उमंग’ ऍप हे अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही मोबाईलवर उपलब्ध आहे. त्यावर आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन करून यूएएन नंबर तयार करता येतो. उमंग ऍपवर ईपीएफओ सेवा सुरू झाल्यास पीएफधारकांना मोबाईल फ्रेंडली प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. सध्या ईपीएफओ वेबसाईटवर ज्या अडचणी येत आहेत, म्हणजे सर्व्हर डाऊन किंवा स्पीड कमी असणे, त्या येणार नाही. जूनपासून नवीन प्लॅटफॉर्म सुरू होईल, असे कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

– अलीकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने पीएफ खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल केला. पीएफ खात्यातून घर खरेदी, लग्न, आजारपण आणि इतर कारणांसाठी पैसे काढता येतात. मात्र, यासाठी यूएएन पोर्टलवरून ऑनलाईन क्लेम करावा लागतो. क्लेम सादर करताना म्हणजेच फॉर्म नंबर 31 भरताना यापूर्वी बँक खात्याचा तपशील, खातेदाराचं नाव असणारा चेकचा फोटो अपलोड करावा लागत असे. मात्र, ईपीएफओनं या संदर्भातील नियम बदलला असून क्लेम सादर करताना चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही किंवा बँक खात्याची माहितीदेखील द्यावी लागणार नाही. याशिवाय ज्या कंपनीत नोकरी करता तिथून व्हेरिफिकेशनची गरज लागणार नाही.

– पीएफ वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी किंवा पीएफची रक्कम काढण्यासाठी यूएएन नंबरची गरज लागते. कंपनीतील एचआर टीम हा यूएएन नंबर तयार करून देते. मात्र उमंग ऍपवर ईपीएफओ सेवा सुरू झाल्यास यूएएन नंबर तयार करण्यासाठी एचआर टीमची गरज लागणार नाही. कर्मचारी स्वतःच यूएएन तयार करू शकतो.