
घरचा अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून ट्युशन टीचरने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली. मुलाच्या पालकांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली क्षेत्रातील क्योटारा मोहल्ल्यात एका खासगी शिकवणीत ही घटना घडली. शिक्षकाने मुलाला सोमवारी इंग्रजीचा घरचा अभ्यास दिला होता. तो अभ्यास मुलाने पूर्ण केला नाही. यामुळे शिक्षक संतापला आणि तिने मुलाला दांड्याने बेदम मारहाण केली.
मुलगा गंभीर जखमी अवस्थेत घरी पोहचताच पालकांना धक्काच बसला. पालकांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. जखमी मुलाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.