ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या घोषणेने सोन्या-चांदीला दिली झळाळी; सोन्यात तब्बल 2 हजाराची वाढ…जाणून घ्या आजचे दर…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तसेच बुधवारी त्यांनी चीनवगळता इतर देशांच्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. टॅम्प आणि या टॅरिफ धोरणाचा शेअर बाजार आणि सोने-चांदीच्या दरावर परिणाम होत आहेत. जगभरातील सर्व देशांचे शेअर बाजार सोमवारी भूईसपाट झाले. तसेच सोन्याचे आणि चांदीचे दर घसरले होते. त्याचप्रमाणे कच्चे तेल आणि नॅचरल गॅसच्या दरातही घसरण झाली. मात्र, बुधवारी ट्रम्प यांच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा सोने-चांदीला तेजी आली आहे.

हिंदुस्थानात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 2,640 रुपयांनी वाढून 93,380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 2,700 रुपयांनी वाढून 85,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर 2210 रुपयांनी वाढून 70,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या दरात आजच्या दिवसात अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असून चांदीच्या किमतीत प्रति किलो 2000 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 95 हजारांवर गेला आहे.

ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आणि शेअर बाजाराचा परिणाम सोने-चांदी यांच्या दरावर होत असतो. सध्या जागतिक अस्वस्थता असून गुंतवणूकदाराही धास्तावले आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने आणि चांदीत गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.