एसंशि सरकारमुळे मुंबईवर पाणीसंकट, टँकर असोसिएशनच्या संपावरून आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई टँकर असोसिएशने संप पुकारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खारपाणी गाळण प्रकल्प आणला होता. पण एसंशि सरकारने हा प्रकल्प रद्द केला त्यामुळे मुंबईवर पाणी संकट आले अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

तसेच मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या पाणीबाणीवर काय उपाययोजना करणार आहे याची माहिती द्यावी असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, मुंबई टँकर असोसिएशनने आज संपाची हाक दिली असून, पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ह्या दिवसांत अनेक गृहनिर्माण सोसायट्या, उंच इमारती, चाळी, व्यावसायिक कार्यालये आणि उद्योगांना ह्याचा फटका बसणार आहे.

तसेच भारत सरकारच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाने बल्क वॉटर सप्लायर्ससाठी ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत, त्यातील अडचणी सोडवल्या जाव्या, ह्या मागणीसाठी असोसिएशन आंदोलन करत आहे.गेल्या तीन वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित असून, महाराष्ट्र सरकारने तो अजूनही केंद्र सरकारकडे गांभीर्याने मांडलेला नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आज दिल्लीतील सरकारी कार्यालयांत बसून बनवलेल्या काही अव्यवहार्य मार्गदर्शक तत्त्वांमुळे मुंबईकरांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. मी बीएमसी आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना ‘ह्या पाणीबाणीवर महापालिकेकडे काय उपाययोजना आहे’, हे स्पष्टपणे सांगावे.

तसेच, एसंशि सरकारने आमच्या कार्यकाळात नियोजित केलेला खारपाणी गाळण प्रकल्प (डिसॅलिनेशन प्लांट) रद्द केला नसता, तर 2026 पर्यंत मुंबईचे पाणी संकट संपले असते असेही आदित्य ठाकरे म्हणाले.