राज्यात ठोकशाही सुरु आहे का? शिर्डीत चार भिक्षुकांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांचा सरकारला सवाल

शिर्डीत भिक्षुक असल्याचा आरोपाखाली पोलिसांनी 51 जणांना तुरुंगात टाकले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राज्यात ठोकशाही सुरु आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, शिर्डीत भिक्षुक असल्याच्या आरोपाखाली 51 जणांना पकडून तुरुंगात डांबले, त्यात काहींची तब्येत बिघडली असता त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांना पाणी देण्यात आले नाही, एकाच रूममध्ये बांधून ठेवले अशा अनेक अमानवी गोष्टी समोर येत आहेत.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या जखमा ओल्या असतानाच पुन्हा कोठडीत असा प्रकार घडल्याने राज्यात ठोकशाही सुरू झाली का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. हिटलरच्या नाझीशाहीप्रमाणे इथल्या यंत्रणा वागायला लागल्या तर सामान्य माणसाचं रक्षण कोण करणार? असे रोहित पवार म्हणाले. तसेच सरकारने या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.