
इंडियन प्रीमियर लीग मधला 23 वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर बुधवारी खेळला गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय राजस्थानच्या चांगलाच अंगलट आला. गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन याने दमदार फलंदाजी केली. राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने 53 चेंडूत तीन षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 82 धावा ठोकल्या.
साई सुदर्शनच्या या खेळीच्या बळावर गुजरातने 20 षटकांमध्ये 217 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर राजस्थानला 19.2 षटकांमध्ये 159 धावात बाद करत 58 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह गुजरातचा संघ पाच लढतीत चार विजयासह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला, तर राजस्थानचा संघ सातव्या स्थानावर घसरला. या लढतीत अर्धशतकीय खेळी करणाऱ्या साई सुदर्शन याने एक खास विक्रम आपल्या नावे केला.
गेल्या हंगामात दमदार कामगिरी केल्यामुळे गुजरातने यंदा 8.50 कोटी मोजून साई सुदर्शनला रिटर्न केले होते. कॉपी बुक क्रिकेट आणि मॉडर्न क्रिकेट या दोन्हींचा ताळमेळ साधत साई सुदर्शनने प्रत्येक लढतीत छाप उमटवली आहे. राजस्थान विरुद्ध 82 धावा करताच आयपीएलच्या 30 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत त्याने दिग्गज फलंदाज क्रिस गेल, केन विल्यमसन आणि मॅथ्यू हेडन यांना मागे सोडले. या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा त्याच्या जवळपासही नाही. साई सुदर्शन वगळता एकाही हिंदुस्थानी खेळाडूला 30 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड 30 डावांमध्ये 977 धावा केल्या होत्या.
Sai grabbing the headlines with a POTM worthy performance! 🏅 pic.twitter.com/iU4vp2rcY9
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 9, 2025
IPL च्या 30 डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
शॉन मार्श – 53.42 च्या सरासरीने 1338 धावा
साई सुदर्शन – 48.40 च्या सरासरीने 1307 धावा
ख्रिस गेल – 43.88 च्या सरासरीने 1141 भावा
केन विल्यमसन – 43.84 च्या सरासरीने 1096 धावा
मॅथ्यू हेडन – 38.64 च्या सरासरीने 1082 धावा