आश्विनी बिद्रे हत्या प्रकरण – पोलिसांचे कुरुंदकर प्रेम कमी होईना; निकालाच्या दिवशी तपास अधिकारी संगीता अल्फान्सोंना जुंपले शहांच्या बंदोबस्ताला

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यावर असलेले पोलीस दलाचे प्रेम तो दोषी आढळून आल्यानंतरही कमी झालेले नाही. येत्या शुक्रवारी कुरुंदकरला पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे शिक्षा ठोठावणार आहेत. निकालाच्या दिवशी या हत्याकांडाच्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो या न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र पोलीस दलाने त्याच दिवशी त्यांना किल्ले रायगडवर येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बंदोबस्ताला जुंपले आहे.

अश्विनी बिद्रे यांची हत्याकांडाचा तपास मोठा आव्हानात्मक होता. मृतदेह सापडलेला नसल्याने करुंदकर याच्यावर आरोप सिद्ध होतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र संगीता अल्फान्सो यांनी तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास करून पुरावे निर्माण केले आणि कुरुंदकरच्या पापाचा घडा भरला. अश्विनी यांची हत्या कुरुंदकर यानेच केली असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्याला दोषी ठरवले. आता येत्या शुक्रवारी कुरुंदकरला या खटल्यात शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. मात्र त्याच दिवशी पोलीस दलाने तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांना न्यायालयात येण्यापासून रोखले आहे. त्यांना रायगडमध्ये व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहे.

खटला कमकुवत करण्याचा सुरुवातीपासून घाट
एका महिला पोलीस अधिकाऱ्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हत्या केली असताना मुंबई पोलिसांनी कधीच हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आम्हाला न्याय देण्याऐवजी आरोपी अभय कुरुंदकर याचीच पाठराखण केली. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास संगीता अल्फान्सो यांच्याकडे होता. मात्र त्यांची अचानक बदली करण्यात आली. पुन्हा त्यांना तपास पथकात घेण्यासाठी मोठे आडेवेडे घेतले. हा खटला कमकुवत करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीपासून घाट घातला होता. आताही त्यांच्याकडून आरोपीचीच पाठराखण केली जात आहे, असा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे.