
एल्फिन्स्टन ब्रिज तोडल्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेला व पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या लोकांचे अत्यंत हाल होणार आहेत. रुग्णांची प्रचंड परवड होणार आहे. त्यामुळे प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉपपर्यंत पादचारी पूल तयार होईपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिजचे पाडकाम करू नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र दिले आहे.
प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉपपर्यंत पूल बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्येदेखील हा विषय सातत्याने मांडला आहे, मात्र त्यासंदर्भात काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, याकडे खासदार अरविंद सावंत यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. एल्फिन्स्टनचा पूल तोडल्यास पश्चिमेकडून पूर्वेला व पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या लोकांचे अत्यंत हाल होणार आहेत. पूर्वेला केईएम, वाडिया, टाटा हॉस्पिटल आहेत. इथे फक्त पश्चिमेकडून पूर्वेलाच नव्हे तर प्रभादेवी स्टेशनवरूनदेखील रुग्ण येतात. पूर्वेला महर्षी दयानंद कॉलेज आहे. तेथे जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी प्रभादेवी स्थानकात उतरतात.
एल्फिन्स्टन ब्रिज तोडला तर प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून येणारे व स्थानकात उतरून पूर्वेकडे येणारे रुग्ण, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी वर्ग या सर्वांचे अतोनात हाल होणार आहेत. त्यांना या विभागात येण्यासाठी दादर स्टेशनच्या टिळक पुलाचा किंवा पुढे करी रोड पुलाचा वापर करून संपूर्ण वळसा घालून यावे लागेल. त्यामुळे प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉपपर्यंत पादचारी पूल तयार होत नाही तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज तोडण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.