
मिंधे गटाविरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सादर केलेले गद्दार गीत देशभरात तुफान व्हायरल झाले. हे गीत झोंबल्यानंतर कुणाल व त्याच्या चाहत्यांवर मिंध्यांकडून सुडाची कारवाई करण्यात आली. हे गद्दार गीत गाणाऱ्या कुणाल कामरावर, गाण्याचा व्हिडीओ शेअर व रिट्विट करणाऱ्यांवर कोणतीही फौजदारी कारवाई करू नये तसेच कामरा याच्या कृतीला संविधानाच्या कलम 19 (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) अंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
कुणालविरोधात मिंधे गटाच्या सुडाच्या कारवाईला आक्षेप घेत हर्षवर्धन खांडेकर यांनी या प्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, कुणालाच्या शोनंतर हॅबिटाट स्टुडिओची राजकीय पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली. याशिवाय इतरांवरही कारवाई करण्यात आली. सरकारविरोधात काही बोलल्यास सरकारी यंत्रणा ताबडतोब जागी होते व कारवाई करते. त्यामुळे सरकारने प्रत्येकाशी समानतेने वागायला हवे. त्यावर कामरा न्यायालयासमोर मदत मागत आहेत. ते गरीब किंवा अशिक्षित नाही आणि तुम्ही त्याच्या बाजूने का लढत आहात? तुमच्या सांगण्यावरून आम्हाला समाधान मानायचे नाही, असे नमूद करत याचिका निकाली काढली.