आजपासून मुंबईतील 1800 टँकर संपावर; हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, सोसायट्या, बांधकामांना बसणार फटका

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल मालकांना बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशन ठाम असून गुरुवारपासून बेमुदत संप सुरू होणार आहे. यात 1800 टँकर्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालये, गृहनिर्माण सोसायटय़ा आणि इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम होणार आहे.

मुंबईतील विहिरी आणि बोअरवेल मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार पालिकेच्या कीटकनाशक विभागाने नोटिसा बजावल्यामुळे विहिरी आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या या भूमिकेविरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

विहिरी, बोअरवेल मालकांना पाठवलेल्या नोटिसीत काय म्हटलेय 

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार मुंबईतील विहिरी किंवा बोअरवेल मालकांना पालिकेची एनओसी घेणे बंधनकारक केले आहे, मात्र एनओसी मिळवण्यासाठी विहिरीभोवतीची दोन हजार फुटांची जागा मोकळी सोडावी, पाणी भरताना टँकर्स सोसायटी किंवा चाळीजवळ उभे करू नयेत, पाण्याचे पूर्ण वर्षांचे पैसे आगाऊ भरावेत, टँकर्सवर मीटर बसवावेत, रेन वॉर्टर हार्वेस्टिंग करावे यासह इतर अटी आहेत, मात्र यातील पहिल्या दोन अटींमुळेच टँकर्सचालक संतापले आहेत. या विहिरी कित्येक वर्षांपासून असून आता त्या सोसायटी, चाळ किंवा खासगी मालकाच्या घराजवळ आहेत. असे असताना या नियमांचे पालन करणे जवळजवळ अशक्य आहे, असे टँकर्सचालकांचे म्हणणे आहे

राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेच्या वतीने आतापर्यंत तरी आम्हाला संपर्क करण्यात आलेला नाही. 5 एप्रिलच्या बैठकीत तसेच 7 एप्रिलला आम्ही सरकारला संपाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने आमच्याकडे जराही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे गुरुवारपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. 

– जसबीरसिंह बिरा, अध्यक्ष, मुंबई वॉटर टँकर असोसिएशन

काय होऊ शकते कारवाई 

मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने विहिरी आणि बोअरवेल मालकांना आतापर्यंत दोन नोटिसा पाठवल्या आहेत. त्यापैकी पहिल्या नोटिसीत सात दिवसांत तर दुसऱ्या नोटिसीत तीन दिवसांत एनओसी घेण्याची ताकीद दिली आहे. विहिरीमालकांना दुसरी नोटीस देण्यात आली असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अशा विहिरींमधून पाणी घेतले तर पालिका कारवाई करील, या भीतीने टँकर्सचालकांना विहिरी, बोअरवेलमधून पाणी घेणे थांबवले आहे. दरम्यान, विहिरी, बोअरवेल मालकांनी एनओसी घेतली नाही तर  महापालिका या जुन्या विहिरी आणि बोअरवेल बुजवून टाकू शकते.