
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थानवर अतिरिक्त आयात शुल्क लादतात. त्यामुळे आर्थिक वादळ येणार असून कोटय़वधी लोकांचे नुकसान होणार आहे. परंतु मोदी लपून बसलेत. बांगलादेश हिंदुस्थानविरोधात विधाने करत आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथे जाऊन तेथील नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. परंतु त्यांच्या तोंडातून हूं की चूं निघत नाही. त्या वेळी तुमची 56 इंचांची छाती कुठे गेली, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर घणाघात केला. गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे 84 वे अधिवेशन सुरू आहे. त्या वेळी ते बोलत होते.
वक्फ सुधारणा विधेयकावरूनही त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानावर हल्ला आहे. आरएसएसच्या ‘ऑर्नगनायझर’ या मुखपत्रात लिहिले आहे की, आता ख्रिश्चनांवर हल्ला होणार आहे. हे धर्मविरोधी विधेयक असून देशातील प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले. जेव्हा इंदिरा गांधींना विचारले तुम्ही डाव्या बाजूला उभे रहाल की उजव्या बाजूला… तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘‘मी ना डावीकडे ना उजवीकडे… मी हिंदुस्थानची पंतप्रधान असून मी सरळच उभी रहाते!’’ पण आजचे पंतप्रधान सरळ आपले डोकेच झुकवतात, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.