महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा, 55 लाख वाढीव मतदार आले कुठून? खरगे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. महाराष्ट्रात तब्बल 55 लाख मतदार कसे वाढले, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच हिंदुस्थानातील लोकशाहीच्या रक्षणासाठी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेतल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

गुजरातच्या अहमदाबाद येथे काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. यावेळी खरगे यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजप 150 जागा लढवते आणि त्यापैकी तब्बल 138 जागांवर जिंकून येते? भाजपाच्या बाजूने 90 टक्के रिझल्ट? इतका मोठा रिझल्ट देशात कधी पाहिला आहे का? असा सवाल खरगे यांनी केला. काँग्रेसने अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, मीदेखील 12 ते 13 निवडणुका लढलो परंतु, असे कधीच कुठे झाले नाही आणि पाहिलेही नाही, असे खरगे म्हणाले.

लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला तो केवळ लोकशाहीला नष्ट करण्यासाठी आणि विरोधकांचा पराभव करण्यासाठी करण्यात आला. आपल्याला या विरोधात लढायचे आहे, असे आवाहन खरगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. निवडणुकीतील घोटाळा रोखण्याऐवजी निवडणूक आयोगाने त्यांना सवाल करणाऱया पक्षांनाच सुनावले, टोमणे मारले, अशा शब्दांत खरगे यांनी निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले.

बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात

संपूर्ण जग ईव्हीएमपासून बॅलेट पेपरच्या दिशेने जात आहे. परंतु, हिंदुस्थानात मात्र ईव्हीएमचा वापर केला जातोय. ही शुद्ध फसवणूक असून ईव्हीएमचा वापर बंद करून हिंदुस्थानातही बॅलेट पेपरने निवडणुका व्हायला पाहिजेत, अशी आग्रही मागणी खरगे यांनी यावेळी केली.

पक्षाची कामे करायची नसतील तर निवृत्ती घ्या!

पक्षाची कामे न करणारे किंवा पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या न पार पाडणाऱयांनी निवृत्ती घ्यावी अशा शब्दांत खरगे यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांना जाहीरपणे खडसावले. संघटनेच्या जडणघडणीत जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे आणि निष्पक्षपणे केली पाहिजे. जिल्हाध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून एक वर्षाच्या आत सर्वोत्तम लोकांचा समावेश करून बूथ, मंडल, ब्लॉक आणि जिल्हा कमिटी तयार करावी. यात कोणताही पक्षपात नसावा, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.

मोदी देश विकून टाकतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीवरही यावेळी खरगे यांनी निशाणा साधला. सर्वसामान्य नागरिकांची संपत्ती मोदी सरकारकडून त्यांच्या श्रीमंत मित्रांकडे हस्तांतरित केली जात आहे, सार्वजनिक उपक्रम मित्रांना दिले जात आहेत. हे सर्व पाहता मोदी एके दिवशी आपला देश विकून टाकतील आणि तो दिवस दूर नाही, असा आरोपही खरगे यांनी केला.