
बहुजन समाजाचा आवाज उठवणाऱ्या निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांच्या चित्रपटांना जाणूनबुजून भरमसाट व अनावश्यक कट सुचवून त्यांची कोंडी करण्याचे सेन्सॉर बोर्डाचे कारस्थान हाणून पाडले पाहिजे. त्याचबरोबर बहुजनांची संस्कृती आणि अभिव्यक्ती नाकरणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा, असा एकमुखी ठराव आज सेन्सॉर बोर्डविरोधी राज्यस्तरीय परिषदेत संमत करण्यात आला.
नामदेव ढसाळ यांचा अपमान करणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
महाकवी, पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संदर्भात कोण आहेत नामदेव ढसाळ, असा उर्मट, उद्धट आणि अपमानजनक सवाल करणारे सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी आणि सेन्सॉर बोर्ड यांचा परिषदेत तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी सेन्सॉर बोर्ड आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असा ठराव परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेला महाराष्ट्रभरातून नाटय़ चित्रपट कलावंत, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, वकील, विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल शो दाखवण्यात आला. ‘चल हल्ला बोल’सारख्या सर्वच चित्रपटांचा प्रदर्शनासाठीचा मार्ग मोकळा होण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
या वेळी ‘चल हल्ला बोल’ या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, अविनाश दास, रवी भिलाणे, विठ्ठल लाड, अभिनेत्री प्रतिभा सुमन शर्मा, पँथर सुमेध जाधव, डॉ. स्वप्नील ढसाळ, डॉ. संगीता ढसाळ आदींनी संबोधित केले.