
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांअभावी उपचार नाकारल्याने गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालयावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना दोषी ठरविण्यात आले आहे. यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रथमदर्शनी घैसास यांना दोषी ठरविण्यात आलेले आहे. दरम्यान, या समित्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.
तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी 10 लाख रुपये डिपॉझिट भरण्याची मागणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी केली, असा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच 10 लाख रुपयांची पूर्तता न केल्यानेच डॉ. घैसास यांनी उपचार करण्यास नकार दिल्याचे भिसे कुटुंबीयांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने नेमलेल्या समित्यांच्या अहवालात डॉ. घैसास दोषी आढळले आहेत. आरोग्य समितीचा अहवाल आणि धर्मादाय आयुक्तांचा 50 पानांचा अहवाल सरकारला प्राप्त झालेला आहे. तसेच रुग्णालयाकडे 35 कोटींचा आयपीएफ निधी शिल्लक असल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर डॉ. घैसास यांना देखील दोषी ठरवल्याने शासन रुग्णालयावर कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. तनिषा भिसे आणि भिसे पुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यानंतर आयोगाने याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल काwन्सिल यांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल आयोगास तत्काळ सादर करण्यास सांगितले आहे.
शिक्षा राहू-केतूला द्यायची का? डॉ. केळकर यांच्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप
पैशांसाठी उपचार नाकारल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पुटुंबियांनी केला होता. या प्रकरणावर बोलताना दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत. तशी पद्धतच आमच्याकडे नाही. मात्र त्या दिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू डोक्यात आला आणि डॉक्टरांनी दहा लाखाचे डिपॉझिट लिहून दिल्याचा खुलासा केला होता, असेही ते म्हणाल्याने त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून आता शिक्षा राहू-केतूला द्यायची का, असा सवाल अंनिसने केला आहे.