
गेल्याच आठवडय़ात घरगुती सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातच मुंबईत आजपासून घरगुती पीएनजी आणि वाहनांच्या सीएनजी गॅसचीही दरवाढ झाल्याने भाजप सरकारविरोधात आज संतापाचा उद्रेक झाला. शिवसेनेने आंदोलनाचा दणका दिला, तर राष्ट्रवादीनेही ठिकठिकाणी तीव्र निदर्शने केली.
View this post on Instagram
‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या भाजप सरकारकडून ‘लाडक्या बहिणीं’ना याआधी महागाईचे चांगलेच धक्के दिले असताना आता घरगुती गॅस आणि वाहन गॅसच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतप्त नागरिक आज सरकारच्या दरवाढीचा निषेध करीत राज्यभरात आंदोलन केले. मुंबईत वरळी, भांडुप आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले, तर जळगावमध्येही राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात हायवेही जाम करण्यात आला. दरम्यान, ‘एमजीएल’कडे सद्यस्थितीत 358 सीएनजी स्टेशन्स आहेत. लोकांना सहज गॅस मिळावा म्हणून आणखी स्टेशन उघडण्याची आपली तयारी असल्याचे एमजीएलकडून सांगण्यात आले.
वाहतूक महागल्याने सर्वच किमती वाढणार
मुंबईत सुमारे 3 लाख ऑटो आणि 20,000 टॅक्सी सीएनजीवर चालतात. याशिवाय, 5 लाखांहून अधिक वाहने सीएनजीवर चालतात. फेब्रुवारीमध्येच ऑटो आणि टॅक्सीच्या भाडय़ात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर आता दरवाढ झाली आहे.
मुंबईत 24 लाखांहून -अधिक घरांमध्ये पाइपद्वारे गॅस वापरला जातो. त्यामुळे आता दरवाढ झाल्याने गृहिणींचा घरखर्च वाढणार आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने वाहतूकही महागणार असून दैनंदिन दिवसांतील सर्वच वस्तूंची दरवाढ होणार आहे.
अशी झाली दरवाढ
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने बुधवारपासून सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 1.5 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत प्रति युनिट 1 रुपये वाढ केली आहे. आता सीएनजीची नवीन किंमत प्रति किलो 79.50 रुपये झाली आहे, तर पाइप गॅसची किंमत प्रति युनिट 49 रुपये झाली आहे.
…म्हणूनच वाढल्या किमती
घरगुती गॅसच्या किमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचे ‘एमजीएल’कडून सांगण्यात आले, मात्र सीएनजी पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याचे ‘एमजीएल’चे म्हणणे आहे.
सहा महिन्यांत चौथ्यांदा वाढ
गेल्या सहा महिन्यांपासून आतापर्यंत सीएनजीच्या किमती चौथ्यांदा वाढवण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 मध्येही किमती वाढल्या होत्या आणि आता एप्रिलमध्ये त्या पुन्हा वाढल्या आहेत.
मोदी सरकार हाय हाय… घोषणांनी हायवे दणाणला
गॅस दरवाढीविरोधात शिवसेना विक्रोळी विधानसभेच्या वतीने आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्चाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना विक्रोळी मध्यवर्ती शाखेपासून पूर्व द्रुतगती मार्गापर्यंत सिलिंडरची अंत्ययात्रा काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त शिवसैनिकांनी हायवे रोखून धरला. यावेळी विक्रोळी विधानसभा प्रमुख परम यादव, महिला विधानसभाप्रमुख सिद्धी जाधव, उपविभागप्रमुख शेखर जाधव, अनंत पाताडे, निलेश साळुंखे, महिला विभागप्रमुख सुष्मा आयरे, रश्मी पहुडकर, दिपाली पाटील यांच्यासव सर्व महिला-पुरुष शाखाप्रमुख, विक्रोळी विधानसभेचे सर्व शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.
सीएनजी दीड तर पाईप गॅस एक रुपयाने महागला
मुंबईसह उपनगरात आजपासून सीएनजी दीड रुपयाने तर पीएनजी म्हणजेच घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला आहे. त्यामुळे आता सीएनजी 79.50 रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट 49 रुपये झाला आहे. घरगुती गॅससाठीचा खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यामुळे गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचे एमजीएलच्या अधिकाऱयांनी सांगितले.
जळगावात राष्ट्रवादीने महामार्गावर सिलिंडर ठेवले
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत गॅस दरवाढीचा निषेध केला. आकाशवाणी चौक येथे रस्त्यावर मधोमध गॅस सिलिंडर ठेवण्यात आले आणि सरकारच्या नावाने भीक मागत निषेध नोंदवण्यात आला. भीकेतून जमा झालेली चिल्लर मोदी सरकारला पाठवून दिली जाणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.