
अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेसच्या 84 व्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने मनमानी पद्धतीने काम केले. खरगे यांनी लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना बोलू दिले गेले नाही, ही लोकशाहीसाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संसदेचे अधिवेशन पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होते. या सरकारकडे महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ नव्हता. यावरून हे लोक लोकशाहीला किती गांभीर्याने घेतात हे दिसून येते. अमेरिकेने हिंदुस्थानवर 26 टक्के कर लादला, परंतु त्यावर संसदेत चर्चा होऊ दिली गेली नाही. तुम्ही 11 वर्षे पंतप्रधान आहात, 13 वर्षे मुख्यमंत्री आहात, तुम्ही येथील गरिबी दूर केली का? असा सवालही त्यांनी केला.
देशातील सरकारी मालमत्ता हळूहळू खाजगी कंपन्यांना विकली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जर हीच परिस्थिती राहिली तर एक दिवस येईल जेव्हा मोदी सरकार आणि स्वतः मोदीजी देशाची मालमत्ता विकून निघून जातील. मी हे स्पष्टपणे सांगत आहे. विमानतळ असो, खाणकाम असो, मीडिया हाऊस असो किंवा टेलिकॉम असो, हे सरकार ते आपल्या उद्योगपती मित्रांना देत आहे. हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील धोका आहे, असेही खरगे यांनी स्पष्ट केले.
भाजप 150 जागा लढवते आणि 138 जागा जिंकते. महाराष्ट्रात घडलेली फसवणूक लोकशाही नष्ट करण्यासाठी करण्यात आली होती. मतदार यादीत झालेल्या चुकांवर आमचे वकील आणि नेते काम करत होते. चोरी करणारा चोर कधी ना कधी पकडला जातोच. आज 15 लाख लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. नोकरीसाठी परदेशात गेलेल्या तरुणांना अमेरिकेतून साखळदंडांनी बांधून हिंदुस्थानात परत पाठवले जाते. मात्र, आपले पंतप्रधान गप्प आहेत. जेव्हा लोकांवर अन्याय होतो तेव्हा पंतप्रधान गप्प बसतात. सत्ताधारी पक्ष वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे की देशाचा विकास 2014 नंतर झाला आहे. मात्र, चंदीगड नंतर देशातील सर्वात आधुनिक शहर गांधीनगर काँग्रेसच्या काळात बांधले गेले, अशी माहितीही त्यांनी दिली.
मोदी काँग्रेसवर आरोप करण्याशिवाय काहीही करत नाहीत. निवडणूक आयोगही त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. निवडणुकीत घोटाळे होत आहेत. जगातील विकसित देश ईव्हीएम सोडून मतपत्रिकांकडे वाटचाल करत आहेत. मात्र, आपण ईव्हीएमच वापरत आहोत. तुम्ही असे तंत्रज्ञान निर्माण केले आहे, जे फक्त तुम्हालाच फायदा देते. जर तुम्हाला अशी तंत्रज्ञान निर्माण करून विरोधकांना दडपायचे असेल, तर उद्या देशातील तरुण उठतील आणि म्हणतील की आम्हाला मतपत्रिका हव्या आहेत, ईव्हीएम नकोत, असेही खरगे म्हणाले.