शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांसमोर वाचला कळवा, मुंब्रा, दिव्यातील समस्यांचा पाढा; बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई, वाहतूककोंडी, वाढते प्रदूषण

बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई, वाहतूककोंडी आणि वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात कलवा, मुंब्रा तसेच दिव्यातील नागरिक सापडले आहेत. या मूलभूत समस्यांकडे ठाणे महापालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीत असलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिव्याला महापालिका सपत्नीक वागणूक देत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर विविध समस्यांचा पाढाच वाचला. दरम्यान या मूलभूत समस्या तत्काळ सोडवण्यात याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्ताकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवा, कळवा व मुंब्रा शहरांची अक्षरशः बजबजपुरी झाली आहे. सत्ताधारी व काही अधिकाऱ्यांच्या ‘मिलीजुली’ने दिव्यात वेगाने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अवघ्या तीन महिन्यांत चार मजल्यांच्या इमारती उभारल्या जात असून अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने दिव्यातील नागरिकांना अंधारात ढकलण्याचे काम बिल्डरांकडून केले जात असल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच सद्यस्थितीत दिवा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. आगामी 20 वर्षांत शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेने दिवा शहरात नवीन जागा शोधून स्वतंत्र प्लाण्ट उभारावा व नवीन जलपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, महिला जिल्हा संघटक वैशाली राणे – दरेकर, युवा शहर अधिकारी प्रतीक पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, शहरप्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, महिला शहर संघटक ज्योती पाटील, उपशहरप्रमुख तेजस पोरजी, अभिषेक ठाकूर, लहू चाळके, विजय कदम आदी उपस्थित होते.