उरणमध्ये दहा हजार बेशिस्त वाहनचालकांवर दंडाचा बडगा, न्हावा-शेवा वाहतूक शाखेची कारवाई; 6 लाख 92 हजार दंड वसूल

दहा हजार बेशिस्त वाहनचालकांवर न्हावा-शेवा वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या सर्व वाहनचालकांकडून सहा लाख 92 हजारांचा दंड वसूल केला आहे. वाट्टेल तेथे पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांची यात सर्वाधिक संख्या असून विदाऊट हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचा समावेश आहे. या बडग्याने बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

नियम धाब्यावर बसवून गाड्या चालवल्या जात असल्याने उरण परिसरात अपघात वाढले असून ट्रॅफिकचा प्रश्नही दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने याची दखल घेत नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यावर अवैध वाहने पार्क करणाऱ्या 4441 वाहनचालक, सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या 1774 वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या 2459 मोटारसायकलस्वार व सिग्नल तोडणाऱ्या एकूण 400 वाहन तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 47 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली आहे.