
क्रिकेटप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आलाच. ‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिमो चषकाला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी 7 वाजता स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पाचदिवसीय या स्पर्धेत विजेतेपदासाठी 16 संघ मैदानात आमने-सामने भिडतील. सांताक्रुझच्या कलिना येथील एअर इंडिया मैदानावरील हा रणसंग्राम ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमींचीदेखील मोठी गर्दी असणार आहे.
गेल्या अकरा वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, आमदार अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. उद्या, बुधवारी सायंकाळी 7 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात होईल. माजी कसोटीपटू प्रवीण अमरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आजी-माजी रणजीपटू, सिनेकलाकार यांचीही यावेळी उपस्थिती असणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांचे जंगी स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण होईल. खेळपट्टीचे पूजन झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल. त्यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीत स्पर्धेला दिमाखात सुरुवात होईल, अशी माहिती आयोजक-आमदार संजय पोतनीस यांनी दिली. याशिवाय
10 एप्रिलला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आमदार रोहित पवार उपस्थित राहतील.
रतन टाटा यांना मानवंदना
2018 साली प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सुप्रिमो चषक पाहण्यासाठी आले होते. त्यांच्यासह मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे आणि महान गोलंदाज पद्माकर शिवलकर यांनाही या सोहळय़ात मानवंदना देण्यात येणार आहे.
देशातील अव्वल टेनिस क्रिकेटपटूंचा सहभाग
कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजकोट केरळसहीत देशातील अव्वल टेनिस क्रिकेटपटू तर या स्पर्धेत सहभागी होणार आहेतच, पण यंदा कर्नाटकच्या एफ. एम. हॉस्पेट संघातून श्रीलंकेचे क्रिकेटपटूही आपल्या क्रिकेटचा जलवा दाखवतील. दररोज तीन सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि एअर इंडियाने मोलाचे सहकार्य केले आहे. सामना अधिकारी म्हणून प्रसिद्ध कसोटीपटू यू.के.सिंग आणि सुरेश शास्त्राr लाभले आहेत.
भरघोस बक्षिसांचा वर्षाव
देशातील सर्वांधिक बक्षीस रकमेची स्पर्धा म्हणून सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेने आपली ओळख निर्माण केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 12 लाख आणि 11 बाईक्स तर उपविजेत्या संघाला 10 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाला प्रत्येकी एक बाईक तर ‘मॅन ऑफ द सीरिज’ जिंकणाऱ्या खेळाडूला मारुती कार दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सहभागी खेळाडूला सन्मानचिन्ह आणि किट बॅग देण्यात येणार आहे.
स्पर्धेला हाऊसफुल गर्दी!
सुप्रिमो कप क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण ‘फेसबुक’, ‘यूटय़ूब’, ‘केबल’ अशा सोशल मीडियावररून होणार आहे. स्पर्धेचे समालोचन मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष एअर इंडियाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या गॅलरीची क्षमता 15 हजार प्रेक्षकांची असली तरी याहून अधिक प्रेक्षक स्पर्धेला गर्दी करतील, असा विश्वास आयोजक संजय पोतनीस यांनी व्यक्त केली.
दिग्गजांमध्ये आज काँटे की टक्कर
बुधवारी सायंकाळी पहिला सामना ताई पॅकर्स (पालघर) विरुद्ध एल. के. स्टार (राजकोट) यांच्यात होणार आहे. ताई पॅकर्समध्ये ओमकार देसाई, करण मोरे तर एल. के. स्टारमध्ये सागर अली, राजू मुखीया या टॉपच्या खेळाडूंचा समावेश आहे. दुसरा सामना डिंग डाँग (रेड डेव्हिल्स, पुणे), विरुद्ध यू. एस. इलेव्हन (मुंबई) यांच्यात होईल. डिंग डाँग या संघात योगेश पेणकर, विजय पावले, क्रिष्णा सातपुते तर यू. एस. इलेव्हन या संघात प्रीतम परब या व्यावसायिक स्पर्धेतील टॉपच्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे दिग्गजांमध्ये आज काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.सुप्रिमोच्या अकरा टुर्नामेंट खेळणारे तीनच खेळाडू असून यात क्रिष्णा सातपुते, ओमकार देसाई आणि प्रीतम परब यांचा समावेश आहे.
स्पर्धेची तयारी जोरात…
सुप्रिमो चषक स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून पीच क्युरेटर नदीम मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. मैदानाच्या चहूबाजूंनी भगवे झेंडे लावले आहेत. स्पर्धेचा लोगो लाल आणि सफेद रंगाचा आहे. याच रंगसंगतीला अनुसरून स्टेडियममध्ये सजावट करण्यात आली आहे. बॉण्ड्री लाईनवर एलईडी स्क्रीन तसेच मैदानात प्रेक्षकांसाठी भलीमोठी स्क्रीन असणार आहे.