
ग्रँट रोड पश्चिम स्लेटर रोड व पोचरखानवाला रस्ता येथील पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली रस्तादुरुस्ती झाडांच्या जिवावर बेतत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या तब्बल दोन वर्षांपासून या ठिकाणच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
पोचरखानवाला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना या ठिकाणच्या जुन्या झाडांची मुळे तोडली जात आहेत. त्यामुळे भविष्यात ही झाडे उन्मळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याचे कामही अत्यंत निकृष्ट प्रकारे करण्यात येत आहे. कामाबाबत विचारणा करायची झाल्यास या ठिकाणचे काम करताना पालिकेचा कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसतो. याचा फायदा कंत्राटदार घेत असल्याचे शिवसेना मलबार हिल विधनसभा सहसमन्वयक सिद्धेश माणगावकर यांनी सांगितले. याबाबत पालिकेच्या रस्ते विभागाचे उपअभियंता यांना माणगावकर यांनी निवेदनही दिले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराची बिले दर्जेदार काम करेपर्यंत रोखून ठेवावीत अशी मागणीही सिद्धेश माणगावकर यांनी केली आहे.