
वरळीसह मुंबईतील विविध भागांत भर उन्हाळ्यात अपुऱ्या आणि दूषित पाण्याची समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मुंबईत पाण्याची समस्या अधिक गंभीर होत असून महापालिकेने तातडीने उपाययोजना करून ही समस्या सोडवावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली.
महापालिका मुख्यालयात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. या वेळी वरळीसह मुंबईतील पाणी समस्या आणि महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या समस्यांबद्दल चर्चा करून यावर तातडीने उपाययोजना करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. याबाबतचे एक निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ उपस्थित होते.
प्राध्यापकांचा पगार वाढवा!
पंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना कायम नोकरीमध्ये समायोजन करून घेण्यात यावे तसेच त्यांचा सध्याचा पगार निवासी डॉक्टरांएवढाच आहे. तरी त्यात वाढ करण्यात यावी तसेच या सहाय्यक प्राध्यापकांना दर 40 दिवसांनी ब्रेक देण्याची पद्धत बंद करून त्यांना सेवेत घेण्यात यावे तसेच महिला डॉक्टरांना प्रसूती रजा देण्यात यावी. या सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुंबईकरांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अधिक प्रयत्न करतील, असे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरा!
मुंबईतील महापालिकेचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालये ही मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत. सध्या मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण 801 साहाय्यक प्राध्यापक पदे आहेत. त्यापैकी केवळ 243 पदे ही नियमित आणि करार तत्त्वावर असलेल्या डॉक्टरांनी भरलेली आहेत. तरीही या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्रध्यापक भरले जात आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या साहाय्यक प्राध्यापकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांचे पात्र वयसुद्धा निघून जात आहे. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरीसाठी भविष्यात त्रास होऊ शकतो, अशी भीती आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबईचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय
मुंबईमध्ये सध्या कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. मुंबईमध्ये विविध प्रकल्प कामांसाठी पाणीपुरवठा करणारे टँकर चालक काही प्रमाणात पाणीपुरवठा करत असतात. परंतु केंद्राने जाहीर केलेल्या नियमांविरोधात त्यांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे उन्हाळा तोंडावर असतानाच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचा पाणी प्रश्न कसा सोडवणार, याबाबत आश्वस्त करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.