
चैत्री वारी कामदा एकादशीचा मुख्य सोहळा मंगळवारी लाखो भाविकांच्या उपस्थित हरिनामाच्या जयघोषात पार पडला. चार लाख भाविकांनी उन्हाळ्याचे दिवस असूनही उपस्थिती लावली. यामुळे पंढरी नगरीं भाविकांनी गजबजली आहे. दर्शन रांगेत सुमारे 1 लाखांहून अधिक भाविक उभे होते. सध्या सोलापूर जिह्यातील तापमानाने 40शी पार केली आहे. अशा रणरणत्या उन्हातही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही हजारो भाविक उभे आहेत. ही दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. तर मंदिर परिसरात कळस दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्नानासाठीदेखील आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलून गेले आहे. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली.