शिवदीप लांडेंची राजकारणात एण्ट्री, हिंद सेना पक्षाची स्थापना

मुळचे महाराष्ट्राचे आणि बिहारमध्ये भारतीय पोलीस सेवेत धडाकेबाज कर्तव्य बजावणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी अखेर राजकारणात एण्ट्री केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हिंद सेना पक्षाची घोषणा केली. लांडे यांनी काही महिन्यांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा होती. अखेर त्यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली. आता त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिह्यात झाला. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले लांडे यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते बिहारचे दबंग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. 19 सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी अचानक पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली होती. राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तेव्हापासून ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा होती.