22 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेची जप्तीची नोटीस

गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे पुणेकरांच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला महापालिका प्रशासनाने अखेर जप्तीची नोटीस पाठवली आहे. मिळकत कराचे थकीत 22 कोटी रुपये दोन दिवसांत जमा न केल्यास पुढील जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आता रुग्णालय प्रशासन पालिकेच्या नोटीसवर दोन दिवसांत काय करणार हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

दीनानाथ ते मणिपाल घटनाक्रमाचा पोलिसांचा स्वतंत्र अहवाल ससून रुग्णालयाला सादर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर ते मणिपाल रुग्णालयातील घडामोडी, घटनाक्रम आणि संबंधितांचे जबाब याचा सविस्तर अहवाल अलंकार पोलिसांनी तयार केला असून तो ससून रुग्णालयाला सादर केला आहे. भिसे यांना सर्वप्रथम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर महिलेला ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथून पुन्हा सूर्या रुग्णालयात नेऊन त्या ठिकाणी महिलेची प्रसूती झाली. तेथे प्रकृती खालावल्याने महिलेला मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा अहवाल तयार केला आहे.

– आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्याकडील पदभार तातडीने काढून डॉ. संदीप सांगळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.