
>> डॉ. अनुपम टाकळकर
भारताने 2005 मध्ये कुष्ठरोग हद्दपार (एलिमिनेट) केला. सरकारी आकडय़ांनुसार 10,000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे हद्दपार! पण त्याचे ‘निर्मूलन’ (इरॅडिकेशन) झाले का? अजिबात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 च्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 2 लाख नवीन प्रकरणं नोंदवली जातात. त्यातली 60 टक्के प्रकरणं भारतातली आहेत. 2021-22 मध्ये आपल्या देशात 75,000 हून अधिक नवीन रुग्ण! आकडे पाहून अंगावर काटा यावा असे. आता प्रश्न असा आहे, आणखी किती दिवस आपण हा आजार आहेच असं मान्य करणार नाही?
काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला तपासलं. हातापायावर संवेदनाहीन चट्टे, चेहऱयावर सूज. निदान केलं तर हिस्टॉइड हॅन्सन्स! हा कुष्ठरोगाचा गंभीर प्रकार. अत्यंत संसर्गजन्य. आता ही केस दुर्मिळ मानली जाते, पण तरीही आलीच ना ओपीडीमध्ये? म्हणजे कुठे तरी पाळंमुळं आहेत अजून.
दुसऱया एका तरुण रुग्णाला वयाच्या पंचविशीत हा आजार झाला. तो दवाखान्यात यायलाच तयार नव्हता. का? तर लोक काय म्हणतील? हा मोठा प्रश्न. कुष्ठरोगावर औषधं मोफत आहेत, पण त्यावर समाजाचं औषध अजूनही नाही.
एक असाच गूगल शिक्षित तरुण, ‘अहो पण डॉक्टर, लेप्रसी तर भारतात नाही ना आता!!’
कुष्ठरोग हा फक्त त्वचेचा आजार नाही. तो मनावर, समाजावर, नातेसंबंधांवर परिणाम करतो. मल्टी-ड्रग थेरपी (MDT) मुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो. WHO हे उपचार मोफत देतं. तरीही लोक डॉक्टरांकडे उशिरा येतात. का? कारण कुष्ठरोगाचं नाव जरी काढलं तरी लोक चार पावलं मागे सरकतात.
आजही समाजात कुष्ठरोग असलेल्या लोकांना नोकऱया मिळत नाहीत, सुनांना माहेरी पाठवलं जातं, लग्नं जुळत नाहीत. हा आजार टाळता येतो, 100 टक्के बरा होतो, तरीही लोक दुरावा ठेवतात.
म्हणजे आजाराचा संसर्ग कमी झाला, पण अज्ञान आणि पूर्वग्रहांचा संसर्ग मात्र वाढलाय!
डॉक्टर म्हणून आमचं काम फक्त औषधं देण्याचं नाही. आम्ही रुग्णांना धीर देतो. त्यांच्या भीतीला सामोरं जायला शिकवतो. रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे शंकानिरसन करतो. रुग्ण स्वतŠ तर आमचा पेशंट असतोच, पण बऱयाच वेळा त्याच्या घरच्यांच्या मनातील गैरसमज शोधून त्यांना योग्य माहिती द्यावी लागते.
जिल्हा कुष्ठरोग अधिकाऱयांकडे नोंदणी होते. सरकारी योजनांचा फायदा मिळतो. पण समाजाचा पाठिंबा मिळाला तर उपचाराचा प्रभाव दुप्पट होईल.
कुष्ठरोग हा लपवण्याचा विषय नाही. तो वेळेवर ओळखून उपचार करायचा विषय आहे. लवकर निदान केलं, योग्य औषधं घेतली, तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. पण त्यासाठी लोकांनी पुढे यायला हवं.
– कुष्ठरोगासंदर्भात अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करूया.
– लक्षणं आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लोकांना प्रवृत्त करूया.
– कुष्ठरोग्यांना समाजाचा आधार देऊया.
– उपचार घेतलेल्या आणि बऱया झालेल्या लोकांना समान संधी मिळवून देऊया.
कुष्ठरोग आजही आहे, पण त्यापेक्षा समाजाचं दुर्लक्ष अधिक धोकादायक आहे. या आजाराला उपचार आहेत, पण मानसिकतेच्या बदलाचीच खरी गरज आहे. आपण कितीही आधुनिक झालो तरी कुष्ठरोगाबद्दलची मानसिकता जर अजूनही जुनाट असेल, तर खरंच आपण प्रगत आहोत का?
स्वत:ला हा प्रश्न विचारा—कुष्ठरोग्यांपासून आपण लांब जाणार, की त्यांच्यासोबत उभं राहणार?
(लेखक त्वचारोग तज्ञ आहेत.)