आदित्य ठाकरे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट, वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांबाबत केली चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. तसेच या भेटीत आदित्य ठाकरे यांनी वैद्यकीय महाविद्यालयां समस्यांबाबत एक पत्र आयुक्तांना दिले व त्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली.

आदित्य ठाकरे यांनी या भेटीचे फोटो ट्विट करत त्याची माहिती दिली आहे. ”आज मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी जी ह्यांची भेट घेऊन, महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा केली. तसेच, लवकरात लवकर त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा; अशी पत्राद्वारे विनंती केली”, असे त्यांनी ट्विट केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रातून मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे आहेत.
– रिक्त 243 सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्यात यावी.
– कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे.
– वेतन वाढ द्यावी.
– महिला डॉक्टरांना प्रसूती रजा द्यावी.