पाकिस्तानी मोहसीन नक्वींच्या नेतृत्त्वात भाजपचे आशीष शेलार यांची ‘बॅटिंग’, राष्ट्रभक्तीचं ढोंग करणारी भाजप ‘क्लिन बोल्ड’

हिंदू खतरे में है… अशी बांग ठोकत एरव्ही भाजप हिंदूंचा मसिहा असल्याचा आव आणतो आणि अनेकदा पाकिस्तान विरोधात भाषणं ठोकून राष्ट्रभक्तीचे उसनं अवसान आणतो. मात्र भाजपच्या या बेगडी हिंदुत्त्वाचा आणि राष्ट्रभक्तीचा बुरखा विरोधकांनी वेळोवेळी फाडला आहे. आता देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आशिया क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) माजी खजिनदार आणि महाराष्ट्रातील भाजपचे विद्यमान मंत्री आशीष शेलार यांचीही ACC च्या सदस्य पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे आशीष शेलार हे पाकिस्तानी मोहसीन नक्वी हातात हात घालून क्रिकेटच्या भविष्यासाठी गुण्यागोविंदाने काम करणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आता आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) चे अध्यक्ष आहेत, त्यांनी श्रीलंकेच्या शम्मी सिल्वा यांच्याकडून औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये पीसीबी चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली होती. आपल्या मिळालेल्या पदाबद्दल नक्वी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘या नियुक्तीमुळे मला ‘मोठा सन्मान’ मिळाला असल्याच्या भावना बोलून दाखवल्या.

‘आशिया खंड जागतिक क्रिकेटचे हृदय आहे आणि खेळाच्या प्रसाराला आणि जागतिक स्तरावर त्याला गती देण्यासाठी मी सर्व सदस्य मंडळांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे’, असे नक्वी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘एकत्रितपणे, आम्ही नवीन संधी निर्माण करू, अधिक सहकार्य वाढवू आणि आशियाई क्रिकेटला अभूतपूर्व उंचीवर नेऊ’, असेही ते म्हणाले आहेत. नक्वी आणि शेलार आता हातात घालून काम करणार आहेत. विशेष म्हणजे मोहसीन नक्वी हे पाकिस्तानात राजकीय नेतेही राहिले आहेत.

तेव्हा विरोधकांनी मुस्लिम समाजाच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला अथवा पाकिस्तानी व्यक्तीची भेट घेतली तर थयथयाट करणारी भाजप स्वत:ची वेळ आली की मात्र मूग गिळून बसते. अशीच स्थिती आताही पाहायला मिळेल. विरोधी पक्षाचे सरकार सत्तेत असताना पाकिस्तानी खेळाडूंना, कलाकारांना हिंदुस्थानात पाय ठेवू न देण्याची भाषा करणारे भाजप सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्ताना खेळाडूंच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसते. आता ACC मध्ये आशीष शेलार देखील पाकिस्तानी मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्त्वात काम करताना पाहायला मिळतील. मात्र त्यावर राष्ट्रभक्तीचे मुखवटे चढवलेले भाजप ब्र ही काढणार नाही.

भाजपच्या छुप्या ‘पाक’प्रेमाचे किस्से

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी 25 डिसेंबर 2025 रोजी पाकिस्तानात जाऊन आले होते.

एवढेच काय तर निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कायमच पाकिस्तानच्या नावाचा वापर केल्याचे दिसते. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या हिंदुस्थानी जवानांच्या प्रसंगाचा वापर करून पाकिस्तान विरोधात जनमत बनवण्याचा प्रयत्न झाला.

बिहारच्या विधानसभा निवडणुकांवेळी देखील जेडीयुचे नितीशकुमार जिंकल्यास पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असा दावा भाजपने केला होता. मात्र आता खुद्द तो भाजपच नितीशकुमारांच्या नेतृत्त्वात दोन टर्म सत्तेत आहे.

2023 मध्ये वर्ल्ड कपच्या निमित्ताने पाकिस्तानी क्रिकेटपटू हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांच्यावर फुले उधळण्यात आली.

पाकिस्तान सोबत हिंदुस्थानने क्रिकेट खेळायचे नाही अशी भूमिका भाजपने सत्तेत आल्यानंतर सोडली आणि पाकिस्तानात क्रिकेट न खेळता ते सामने तिसऱ्या देशात भरवू लागले. इतकेच नाही तर भाजपचे मंत्री हिंदुस्थान-पाकिस्तानचे सामने पाहण्यासाठी म्हणून गेल्याचे वेळोवेळी दिसले आहे. यामुळे भाजपचे हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती किती खोटे असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) चे अध्यक्ष जय शाह, तत्कालिन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी, भाजप नेते अनुराग ठाकूर आणि इतरांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) क्रिकेट सामना पाहिला होता.