देवगिरीच्या चहूबाजूंनी वणवा पेटला, परिसरात धुराचे लोट

Fire breaks out around Devagiri Fort smoke in the area

मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो आणि त्याचे परिणाम पाहायला मिळातात. उन्हाळ्यात वणवा पेटण्याच्या घटना कानांवर येतात. दरवर्षी देवगिरी किल्ला परिसरात वणवा पेटतो. यंदाही वणवा भडकला आहे. पण यंदाचा वणवा अधिक धोकादायक बनला असून देवगिरीच्या बालेकिल्ल्यावर असलेल्या बारादरीलाच आगीने वेढले आहे. काला कोटमधून वणवा पेटण्यास सुरुवात झाली आणि वाऱ्याने आगीचे लोट वरपर्यंत गेल्याची माहिती समोर येत आहे.

बारादरीच्या छताला आणि सज्ज्याला असलेल्या लाकडी तुळयांनीही पेट घेतला होता. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बारादरीची आग आटोक्यात आणली, पण बाकी किल्ल्यावर भडकलेला वणवा चारही बाजूंनी पसरल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाचे तीन बंब सकाळपासून किल्ल्याबाहेर उभे आहेत, पण आगीने वेढा घातल्याने कुठूनच आत जाता येत नसल्यामुळे त्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. पुरातत्व विभागाकडेही स्वतःची काही अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टीम नसल्यामुळे सकाळी साडे नऊ वाजता पेटलेला वणवा अजूनही काबूत येऊ शकलेला नाही.