
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या गरोदर महिलेकडे खंडणी मागितली असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार उद्धव बाळसाहेब ठाकरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवू पाहत आहेत? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गरोदर महिलेकडे 10 लाख रुपये मागितले. त्या महिलेला ही खंडणी देता आली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रुग्णालयावर कारवाई करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण त्यापूर्वी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या रुग्णालयाच्या अंतर्गत समितीने पैसे मागितलेच नसल्याचे म्हटले आहे. तर काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी पैसे मागितल्याचे म्हटले आहे आणि त्या डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचेही सांगितले. स्वतःला वाचवण्यासाठी विरोधाभासी विधानं करणाऱ्या रुग्णालयावर पुणेकर कसा काय विश्वास ठेवू शकतात? असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जर रुग्णालय अशी खंडणी मागत असेल तर त्यांनी जो मालमत्ता कर भरलेला नाही जो कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे त्याचे काय? तपाससंस्था त्या रुग्णालय चालवणाऱ्यांच्या आणि ट्रस्टींच्या घरात तपासासाठी जाणार का? हे रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाला वाचवू पाहत आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.