विदर्भात उष्णतेची प्रचंड लाट येणार; तापमान 44 अंशांवर जाणार

महाराष्ट्रासह देशातील तापमानात प्रंचड वाढ होत आहे. त्यातच हवामान खात्याने या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आता येत्या जोन दिवसात महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेची प्रंचड लाट येणार असून तापमान 44 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात इतर राज्यातही तापमानात वाढ होणार आहे.

दोन दिवसांपासून राज्यात आणि विशेषकरून विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे. मुंबई आणि समुद्रकिनारच्या भागात आर्द्रताही जास्त असल्याने या भागात घामाच्या धारा निघत आहेत. आता पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विदर्भात सध्या सरासरीच्या चार अंश सेल्सिअसपर्यंत पेक्षा जास्त तापमान आहे. मार्च महिन्यात सरासरीच्या अधिक तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान आहे. त्यातच 9 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजी विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात अकोल्यात सोमवारी सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गुजरात व राज्यस्थानहून येणारे उष्ण वारे हे अतिउष्ण व कोरडे असल्याने राज्यातील तापमान झपाट्याने वाढत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.