अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण – माझ्या भाच्याला राजकीय दबावातून गुन्ह्यात अडकवले; नाव न घेता खडसेंची देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाशी माझा भाचा राजू पाटील यांचा काडीचाही संबंध नाही. हा गुन्हा घडल्यानंतर आरोपीने पाटील यांना फोन केला. त्यामुळे ते मीरा रोड येथे गेले. त्यांच्यात फक्त दीड मिनिटाचे संभाषण झाले. त्यावरून माझ्या राजकीय विरोधकांनी पाटील यांना कटात अडकवले. मात्र पनवेल जिल्हा न्यायालयाने आता त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने याच विरोधकांना सणसणीत चपराक बसली आहे, अशी तोफ आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता डागली आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यातून पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधींश के. जी. पालदेवार यांनी राजू पाटील यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. हत्याकांड घडल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने राजू पाटील यांना फोन करून बोलावून घेतले होते. त्यानुसार पाटील हे अंधेरीतून मीरा रोड येथे गेले होते. त्या ठिकाणी त्यांचे आरोपी बरोबर दीड मिनिटाचे संभाषण झाले होते. यापलीकडे त्यांचा हत्याकांडाशी कोणताही समोवश नाही, असे स्पष्टीकरण यावेळी न्यायालयाने दिले. या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. हे हत्याकांड 11 एप्रिल 2016 मध्ये घडले. मी मंत्रीपदाचा राजीनामा जून २०१६ मध्ये दिला. त्यानंतर सहा महिन्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यावेळी माझे राजकीय विरोधक मोठे होते. त्यांच्या इशाऱ्यानुसारच माझ्या भाच्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले. त्याची या खटल्यात आता न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र सात वर्षे त्याला विनाकारण तुरुंगवास भोगावा लागला, अशीही नाराजी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.