
निसर्गाने नटलेल्या येऊरच्या जंगलावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. वनविभागाच्या वतीने विविध 30 ठिकाणी अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येणार असून जंगलातील हालचालींवर 24 तास लक्ष ठेवण्यात येईल. येऊरच्या जंगलामधील प्राण्यांच्या हालचाली, अन्य अवैध धंदे त्याचप्रमाणे बेकायदा शिकारीलादेखील ट्रॅप कॅमेऱ्यांमुळे चाप बसणार आहे. त्यासाठी वनविभागाने स्वतंत्र टीम स्थापन केली आहे.
अंदाजे 10 हजार स्क्वेअर मीटर परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा 60 टक्के भाग हा वनविभागाच्या येऊर रेंजमध्ये मोडतो. मात्र गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय उद्यानाची जागा कमी होत चालली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे जंगलातील जैवसृष्टीच धोक्यात आली आहे. जंगलातील वन्यजीव आणि वन संपदेची सुरक्षा करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहेत. आता त्यांच्या मदतीसाठी कॅमेराचा तिसरा डोळा नजर ठेवून असणार आहे. वनविभागाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येऊर रेंजमधील महत्त्वाच्या 30 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार आहेत.
40 प्रकारचे वन्यजीव
येऊरच्या जंगलात बिबटे, माकड, हरण, मुंगूस, रानमांजर, रानडुक्कर असे ४० प्रकारचे वन्यजीव आढळून येतात. या वन्यजीवांबरोबर जंगलाची देखभाल करण्याची मोठी जबाबदारी वनविभागाकडे आहे. त्यामुळे जंगलाची सुरक्षा अधिक भक्कम होण्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार आहेत.
‘ट्रॅप कॅमेरे दिवसाबरोबर तितक्याच कुशलतेने रात्रीदेखील काम करणार आहेत. कोणते वन्यप्राणी तसेच पक्षी येऊरच्या जंगलात आढळतात याचीही माहिती मिळेल. तसेच जंगलात बेकायदा फिरणाऱ्या व्यक्ती आणि गुन्हेगारांवर वाँच ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे उपयुक्त ठरतील.’
– मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी,येऊर